रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; सर्वच तालुक्यात पूर परिस्थिती…
रत्नागिरी, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सर्वदूर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर जिल्ह्यातील इतर नद्या देखील इशारा पातळीवर वाढत आहे. सर्वाच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धोक्याच्या पातळीवर वहात असलेल्या जगबुडी नदीला पूर आला आहे. खेड शहरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी वाढू लागल्यामुळे चिपळूण नाका, तळ्याचे वाकण परिसरातील एकूण 125 नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.Rain damage in Ratnagiri district; Flood situation in all taluks…
चिपळूण मधील वाशिष्टी आणि शिव नदीला पूर आल्याने पुराचे पाणी नजीकच्या परिसरात भरण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी NDRF ची टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
दापोली मंडणगड रस्त्यावर पालगड पवारवाडी पुलावरून पाणी जात असल्याने पाण्याचा अंदाज घेऊन येथील वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे. मंडणगड तालुक्यातील भारजा नदीला पूर आला असून चिंचघर मांदिवली पुलावरून पाणी जात असल्याने या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यात कोंड आंबेड-
डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा फणसवणे भागात जि. प. रस्त्यावर पाणी भरल्याने सदरच्या भागातील देखील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनेक लहान मोठे मार्ग पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली नदीला देखील पूर आला असल्याने राजापूर नगर परिषदेच्या वतीने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सावध करण्यात आले आहे.
दरम्यान हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून देखील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ML/ML/PGB
14 July 2024