धर्मवीर -२ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे येथील शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर ९ ऑगस्ट रोजी धर्मवीर-२ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच होती. नुकताच धर्मवीर-२चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून हा चित्रपट हिंदी भाषेमध्येसुद्धा प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर -२ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्टस् या प्रोडक्शन कंपनीचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिलं असून चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे.
टीजरमध्ये एक मुस्लिम महिला राखी बांधायला दिघे साहेबांकडे येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात… त्याचवेळी खास शैलीत साहेब म्हणतात, ‘ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी, त्याची बरबादी नक्की!’ अंगावर काटा आणणाऱ्या या टीजरमधून साहेबांच्या हिंदुत्त्वाची एक झलक पाहायला मिळते. त्यामुळे आता चित्रपटाविषयी तीव्र उत्सुकता निर्माण होत आहे.
धर्मवीर -२ या चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. त्याने या चित्रपटाचा ट्रेलर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत ‘ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की….धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाचा टिझर!! धर्मवीर – २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’असं कॅप्शन दिलं आहे.
SL/ML/SL
7 July 2024