मुंबईत वृद्ध व्यक्तीची सव्वादोन कोटींची सायबर फसवणूक

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वृद्ध व्यक्तींच्या भोळेपणाचा फायदा उचलून त्यांची ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करण्याचे प्रकार हल्ली सर्रास पहायला मिळतात. मुंबईतील एका ७६ वर्षाच्या व्यक्तीला धाक दाखवून तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहारात बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून ७६ वर्षीय वृद्धाची सव्वादोन कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोड परिसरात ७६ वर्षीय व्यक्ती पत्नीसोबत राहतात. तक्रारीनुसार, ११ एप्रिल रोजी व्हॉट्स ॲपवर त्यांना दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने वांद्रे गुन्हे शाखेतून संदीप राव बोलत असल्याचे सांगितले. आधारकार्डवरून कोणीतरी सिमकार्ड घेतले असून त्यांना आधारकार्ड पाठवण्यास सांगण्यात आले. त्यांनी आधारकार्डची दुय्यम प्रत आणि काही कागदपत्रे तक्रारदाराला पाठवली. त्यात नरेश गोयल विरूद्ध दाखल आर्थिक गुन्ह्यांत त्यांचाही सहभाग असल्याचे नमूद होते. कागदपत्रे पाहून त्यांना धक्का बसला . तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या एका कागदपत्रातही त्यांचे नाव दिसले.
अधिकाऱ्याने हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचे सांगून याबाबत कुणाकडेही वाच्यता करू नये असे बजावले. चौकशीदरम्यान खात्यातील सर्व रक्कम अधिकाऱ्याने सांगितलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केली. तपास यंत्रणांची नावे घेऊन १२ एप्रिल ते २० एप्रिलदरम्यान त्यांना २ कोटी १८ लाख रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले.
यावेळी, मुंबई गुन्हे शाखा, आरबीआय, सर्वोच्च न्यायालय, प्राप्तीकर विभाग, ईडी अशा विविध यंत्रणांच्या नावाचा वापर करून बनावट नोटीस पाठवून, नरेश गोयल गुन्ह्याशी संबंध असल्याचे भासवून ७६ वर्षीय तक्रारदाराचे बँक खाते रिकामे करण्यात आले. अखेर तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार, दक्षिण सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला आहे.
SL/ML/SL
4 July 2024