अंबादास दानवे यांची निलंबन प्रकरणी फेरविचाराची विनंती

 अंबादास दानवे यांची निलंबन प्रकरणी फेरविचाराची विनंती

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपले निलंबन रद्द करण्याची विनंती आज उप सभापतींना केली असून त्यावर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

आज प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य सभागृहात आले. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाबाबत उपसभापतींनी फेरविचार करावा अशी मागणी केली, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शवली आहे, आमच्या पक्षप्रमुखांनी देखील माता भगिनींची माफी मागितली आहे असं सांगत विरोधी पक्षनेत्या शिवाय कामकाज करणं आमच्यासाठी कठीण असल्याचं परब यांनी सांगितलं.

यासंदर्भात निर्णय होईपर्यंत सभागृहात खाली बसून कामकाजात सहभागी होण्याची भूमिका अनिल परब यांनी मांडली. यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका मांडली. विरोधक आपल्यावर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न करत असले तरी आपण संवेदनशील व्यक्ती असल्यामुळे यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं गोऱ्हे यांनी सांगितले.

उपसभापतींच्या या आश्वासनानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बाकावर बसून कामकाजात सहभागी झाले.
याच दरम्यान सभागृहातल्या निलंबनाबाबत फेरविचार करावा अशी विनंती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना एका पत्राद्वारे केली आहे. सभागृहाचं पावित्र्य कायम राहावं अशी भूमिका मांडत झालेल्या प्रकाराविषयी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी असल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता- भगिणींना न्याय देण्याच्या दृष्टीनं अनेक प्रश्न सभागृहात मांडायचे आहेत असं सांगत निलंबनाचा फेरविचार करण्याची विनंती दानवे यांनी पत्रात केली आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या निलंबनासंदर्भात फेरविचाराचा निर्णय अद्याप विचाराधीन आहे असं उपसभापतींनी यानंतर सभागृहात स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाबाबत फेरविचार करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे, उद्या संसदीय कार्य मंत्री सभागृहात याबाबतचा निर्णय जाहीर करतील असे सभागृहात स्पष्ट केले. यामुळे दानवे यांचे निलंबन उद्या रद्द होते की कायम राहते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Ambadas Danve’s request for reconsideration in the case of suspension

ML/ML/PGB
3 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *