आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशव्या मुक्त दिन : पर्याय शोधण्याची गरज
– राधिका अघोर
प्लॅस्टिक पिशव्यांचा इतिहास बघायला गेलो, तर तो उणापुरा 100 वर्षाचाही नाही. इंग्लंडमधल्या एका हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात 1930 च्या सुमाराला, पॉलिथिन या रसायनाची अपघातानेच निर्मिती झाली, आणि कागद किंवा कापडापेक्षा त्याची उपयुक्तता अधिक आहे, हे लक्षात आल्यानंतर, या पॉलिथिनपासून प्लॅस्टिक पिशव्या बनायला सुरुवात झाली. आधी म्हटलं तसं, या प्लॅस्टिक पिशव्या काहीही पॅकिंग करण्यासाठी, छोट्यात छोट्या वस्तूपासून ते द्रव पदार्थ आणि मोठमोठ्या वस्तू एकडून तिकडे वाहून नेण्यासाठी स्वस्त, टिकावू आणि अजिबात वजन नसलेला पर्याय म्हणून लोकांना सापडला. आणि जगभर त्याची निर्मिती, वापर अत्यंत वेगाने होऊ लागला. त्यात नवनवीन तंत्रज्ञान येऊन, सगळ्या आकाराच्या आणि अत्यंत स्वस्त अशा पिशव्या बनायला लागल्या. या पिशव्यांमधून गरिबांना कोणतीही गोष्ट अगदी कमी पैशात विकत घेणे शक्य झाले, आणि त्यातूनही प्लॅस्टिकबंद पदार्थांचा वापर प्रचंड वाढला. सहज निर्मिती, उपयुक्तता आणि त्यानंतर सवय यामुळे माणसाला प्लॅस्टिक पिशव्यांच्या रूपाने, एक खजिनाच मिळाल्यासारखा, त्याचा भरमसाठ वापर होऊ लागला. मात्र जसजसा वापर वाढला, तसतसे त्याचे तोटे लक्षात येऊ लागले. साधारण 500 वर्षांनी किंवा कधीही नष्ट न होणारं हे प्लॅस्टिक पर्यावरणासाठी अतिशय घातक आहे, हे लक्षात आलं.
जमिनीत, पाण्यात, नदी-नाल्यामध्ये, प्राण्यांच्या शरीरात आणि आता तर माणसांच्याही शरीरात जाऊन बसणाऱ्या ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, जमिनीची सुपीकता संपवतात, विहिरी, नदीचे झरे बंद करतात, नाल्याच्या, सांडपाणी वाहून नेणाऱ्या प्रवाहाच्या मुखात जाऊन, तो प्रवाह बंद करतात आणि नाले, सांडपाणी तुंबून, पुरासारखा धोका निर्माण करतात. प्राण्यांच्या-माणसांच्या शरीरात जाऊन, त्यांच्या जीवाला धोकादायक ठरतात, असे सगळे प्लॅस्टिकचे घातक परिणाम लक्षात येऊ लागले, ते ही अगदी काही वर्षात. म्हणजे साधारण तीसच्या दशकात निर्माण झालेल्या प्लॅस्टिकनं त्याचं अत्यंत घातक, आक्राळविक्राळ स्वरूप दाखवलं, ते 1997 साली, प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या एका बेटामुळे. हे बेट, ‘The great pacific garbage patch’ म्हणून ओळखले जाते, ते दुसरे तिसरे काही नसून, समुद्रात जमा झालेल्या प्लॅस्टिकचा एक अत्यंत आक्राळ विक्राळ असा ढीग आहे.
एकीकडे जपान तर दुसरीकडे अमेरिका अशा दोन देशांच्या मध्ये असलेला हा प्लॅस्टिक कचरा, एखाद्या देशा एवढा आहे, जगातला सर्वात मोठा प्लास्टिकचा ढीग आहे. यामुळे या संपूर्ण पट्ट्यातील सागरी जीवन पूर्णपणे नष्ट झालं आहे, मृतप्राय झालं आहे. आशिया आणि अमेरिका या दोन खंडातल्या आपण लोकांनी टाकलेला सगळा प्लॅस्टिक कचरा, बाटल्या आणि काय काय या महासागरात जाऊन स्थिरावला आहे, घट्ट रुतून बसला आहे. हे प्लॅस्टिक पोटात जाऊन कित्येक सागरी जीव मृत्यूमुखी पडत आहेत, वनस्पती नष्ट झाल्या आहेत. आपण केवळ या बेटाची छायाचित्रं बघितली तरीही, या संकटाची भीषणता, विद्रूप आणि उग्र स्वरूप आपल्याला समजू शकेल. हे चित्र तर विदारक आहेच, मात्र त्याहीपेक्षा अधिक भीतीदायक आहे, ती लोकांची निबर मानसिकता. ज्या पृथ्वीवर आपण राहतो आहोत, जिथल्या पर्यावरणावर आपलं अस्तित्व अवलंबून आहे, त्याची अजिबात जाण नसणे, किंवा जाण असली तरी, ‘मला काय त्याचे’ अशा वृत्तीने वावरणारी माणसं, ह्या प्लास्टिकच्या बेटापेक्षाही अधिक धोकादायक आहे. आणि अशाच लोकांचं भान परत आणून पृथ्वीला प्लॅस्टिक मुक्त करण्याचा संकल्प करण्यासाठी, आजचा दिवस, आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक मुक्त दिन म्हणून पाळला जातो. खरं तर प्लॅस्टिकचे धोके सांगण्यासाठी आता बराच प्रचार- प्रसार केला गेला आहे. संपन्न आणि विकसित देश तसेच जगभरातल्या आर्थिक दृष्ट्या उच्च वर्गाने आधी त्याचा भरमसाठ वापर केला, मात्र आता त्याचे धोके जाणवल्यावर वापर कमी केला आहे. मात्र बहुसंख्य असलेल्या मध्यमवर्गीय, गरीब लोकांमध्ये आजही प्लॅस्टिकचा वापर सुरूच असतो. याचं मुख्य कारण म्हणजे, ते स्वस्त, सहज उपलब्ध असणं आणि त्याची उपयुक्तता. जोपर्यंत त्याची उपयुक्तता आहे, तोपर्यंत प्लॅस्टिकचा वापरही सुरूच राहणार आहे, ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता, ज्या विज्ञानाने प्लॅस्टिक निर्माण केलं, त्यानेच प्लॅस्टिकचे विघटन करण्याचे शास्त्रही निर्माण केले आहे, त्याचा वापर करून प्लॅस्टिकचा पुनर्वापर अणि पुनर्प्रक्रिया याला चालना द्यायला हवी. मात्र, त्याचवेळी, प्लॅस्टिकचा कमीतकमी वापर करणे, जिथे शक्य आहे, तिथे कापड, कागदी पिशव्या यांच्यासारखे पर्याय वापरणे, आणि सर्वात मुख्य म्हणजे वापरलेल्या पिशव्या इथे तिथे फेकून न देता एका ठिकाणी जमा करून, त्यांच्यावर पुनर्प्रक्रिया होऊ शकेल, अशा केंद्रात, सुक्या कचऱ्यात टाकणे हे तर अगदी सहज शक्य आहे. किमान एवढा संकल्प जरी केला तरी खूप होईल.
सरकारी पातळीवर अमुक मायक्रोनच्या प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी, असे फतवे काढण्यापेक्षा, सरळ अशा धोकादायक प्लॅस्टिकचे उत्पादनच बंद केले, तर लोक आपोआप प्लॅस्टिकला पर्याय शोधतील. मागच्या शतकात, प्लॅस्टिक नव्हतं तरी, माणसं जगत होतीच की.. आणि चांगली जगत होती.. किमात सुंदर आणि निरोगी वसुंधरा हवी असेल, तर या एका बाबतीत तरी माणसांना काळाच्या मागे घेऊन जाण्याची नितांत गरज आहे.