दादर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची आयुक्तांकडून पाहणी

दादर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची आयुक्तांकडून पाहणी
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून तीव्र करण्यात आली आहे. विशेषतः अत्यंत वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करुन अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले आहेत.
या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसराला आज (दि.१ जुलै ) दुपारी अचानक भेट देवून पाहणी केली.
मुंबई महानगरातील पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले तसेच इतर अतिक्रमणे यामुळे पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले व पदपथांवरील अतिक्रमणे यावर केली जाणारी कारवाई अधिक तीव्र करण्याची सूचना माननीय उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानुसार, अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासनाला वेग द्यावा, आत्यंतिक वर्दळीच्या परिसरांमध्ये अधिक नियोजनपूर्वक व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करावी, रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने हटवावीत, जेणेकरुन नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सर्व संबंधित विभागांना दिले होते. याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पोलीस प्रशासनासमवेत नुकतीच बैठक देखील पार पडली. त्यानंतर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ठिकठिकाणी अनधिकृत फेरीवाले निष्कासन कारवाई अधिक तीव्रतेने राबविण्यात येत आहे.
मुंबई महानगरातील आत्यंतिक वर्दळीचा परिसर म्हणून दादरची ओळख आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरातून अनधिकृत फेरीवाले हटवल्यानंतर नागरिकांनी त्याचे स्वागत केले होते. या ठिकाणची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज दुपारी अचानक भेट देवून पाहणी केली.
श्री. गगराणी यांनी दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील सेनापती बापट मार्ग, केशवसूत उड्डाणपुलाखालून ये-जा करण्यासाठी असणारे प्रवाशी मार्ग / गाळे, तसेच संलग्न असणारे एम. सी. जावळे मार्ग, डॉ. डिसिल्वा मार्ग, रानडे मार्ग इत्यादी सर्व परिसरांमध्ये पायी फिरुन पाहणी केली. अनधिकृत फेरीवाल्यांवरील निष्कासनाची कारवाई सुरु ठेवावी, वीजेच्या अनधिकृत जोडण्या आढळून येताच त्या तातडीने खंडीत कराव्यात, रेल्वे स्थानक परिसरातील कचरा निर्मूलन प्रभावीपणे करुन परिसर स्वच्छ ठेवावा, इत्यादी निर्देश देत त्यावर विशेष लक्ष ठेवण्याचीही सूचना केली. त्याचप्रमाणे, दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करणे सोपे व्हावे, यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या वाहनांच्या तुलनेत लहान आकाराची अतिक्रमण निर्मूलन वाहने उपलब्ध करुन घेण्याचीही सूचना महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी केली.
या पाहणीप्रसंगी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजीतकुमार आंबी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (छत्रपती शिवाजी महाराज मैदान पोलीस स्थानक) श्री. मुरकुटे यांचेसह महानगरपालिकेचे तसेच दादर पोलीस स्थानकातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. दादर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची आयुक्तांकडून पाहणी Inspection by commissioner of action against unauthorized hawkers in Dadar railway station area
ML/ML/PGB
1 July 2024