पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून 33 ठिकाणी छापेमारी

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्या प्रकरणी CBI कडून आज मुंबई आणि नाशिक परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने पासपोर्ट सेवा केंद्र केंद्रांवर संयुक्तपणे छापेमारी केली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघड झाला आहे. सीबीआयने आता या प्रकरणासंदर्भात अनेक एफआयआर नोंदवले आहेत.
SL/ML/SL
29 June 2024