बॅग चोरीला गेलेल्या महिलेला रेल्वे देणार 1 लाख रू भरपाई

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्रेनमध्ये सामान चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. याबाबत तक्रारही नोंदवली जाते. मात्र प्रवाशांना हरवलेले सामान परत मिळण्याच्या घटना मात्र फारच विरळ आहेत. अशाच एका तक्रारीत तक्रारदार महिलेला ग्राहक मंचाच्या आदेशानंतर रेल्वेकडून तब्बल १ लाख ८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
दिल्लीतील एका महिलेची ट्रेनमध्ये बॅग चोरीला गेली. यानंतर तिने रेल्वे पोलिसांकडे रितसर तक्रार केली. पण रेल्वे प्रशासनाने ही चोरी फारशी गांभीर्याने घेतली नाही. त्यानंतर हे प्रकरण ग्राहक संरक्षण कक्षात गेले. जया कुमारी असे या महिलेचे नाव असून त्या मालवा एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यातून प्रवास करत होत्या. यावेळी त्याच्याकडील सामानाची चोरी झाली. जानेवारी 2016 मध्ये त्या दिल्लीहून इंदूरला जात असताना ही घटना घडली होती.
जया कुमारी यांनी ग्राहक न्यायालयात आपली बाजू मांडली. त्या म्हणाल्या, मालवा एक्स्प्रेसमध्ये माझ्या कोचमध्ये काही लोक होते. त्यांचे रिझर्व्हेशन नव्हते. त्यांनी माझी बॅग चोरली. मी तात्काळ टीटीईला याची माहिती दिली. सोबतच या घटनेबाबत रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रारही केली पण माझ्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे जया कुमारी म्हणाल्या. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी व्हावा तसेच त्यांच्या सामानाची सुरक्षा ही रेल्वेची जबाबदारी असल्याचे जया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले. तक्रार दाखल करूनही त्यांचे चोरीचे सामान परत मिळालेले नाही. दरम्यान ग्राहक मंचासमोर याची सुनावणी झाली.या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार रेल्वेला होता, असे ग्राहक मंचाने सांगितले.
सुनावणीदरम्यान जया कुमारी यांनी सामान ठेवण्यामध्ये निष्काळजीपणा केला होता किंवा त्यांच्या सामानाची नोंद करण्यात आली नव्हती, असा युक्तीवाद रेल्वेकडून करण्यात आला. पण ग्राहक मंचाने तो फेटाळला. एफआयआर दाखल करण्यासाठी महिलेला धावपळ करावी लागली. सामान चोरीला गेल्यानंतर आपल्या कायदेशीर हक्कांसाठी महिलेला मनस्ताप सहन करावा लागला, असे ग्राहक न्यायालयाने म्हटले.
रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे आणि सेवेच्या अनास्थेमुळे मालाची चोरी झाल्याचे ग्राहक मंचाने आपल्या आदेशात म्हटले. महिलेने आरक्षित तिकीट घेऊन प्रवास केला होता. तरीही तिचे सामान चोरीला गेले. जर रेल्वे किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून सेवेत निष्काळजीपणा किंवा कमतरता राहिली नसती तर सामानाची चोरी झाली नसती. त्यामुळे या महिलेचे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले. यासोबतच तिला झालेल्या मानसिक त्रासासाठी 20 हजार आणि 8 हजार रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश ग्राहक न्यायालयाने दिले.
तुम्ही जर तिकीट आरक्षित केलं असेल आणि आरक्षित डब्यातून प्रवास करताय तर सामानाच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेची असते. प्रवाशांनी आपले सामान सोबत ठेवावे आणि मौल्यवान वस्तू सोबत ठेवाव्यात. तरी देखील रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) कडून ट्रेनमध्ये सुरक्षा पुरवली जाते. एखाद्या प्रवाशाचे सामान चोरीला गेल्यास त्याने ताबडतोब रेल्वे कर्मचाऱ्याला (TTE, RPF अधिकारी) याची माहिती देणे आवश्यक असते. प्रशासन आणि आरपीएफ हे प्रवाशांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे तपास करतात. काही प्रकरणांमध्ये प्रवाशांना भरपाईही मिळते. मात्र अशा घटना फारच क्वचित घडतात.
SL/ML/SL
28 June 2024