पुणे मेट्रोची स्वारगेट सेवा गणेशोत्सवापूर्वी

पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज न्यूज नेटवर्क) : मेट्रोची स्वारगेटपर्यंतची सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, जुलैअखेरीस ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे महामेट्रोने नियोजन केले आहे.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असून, हा मार्ग ३.६४ किलोमीटरचा आहे. या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. यातील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून जातो. त्यामुळे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे नदीपात्राखालून मेट्रो धावणार आहे. या मार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गाचे काम जुलैअखेरीस पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे.
ML/ML/SL
27 June 2024