सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन : आकार लहान पण कामगिरी महान
मुंबई, दि. 27 (राधिका अघोर) :मोठमोठ्या उद्योग व्यवसायाच्या आणि उद्योजकांची कीर्ती आणि प्रभाव दोन्हीच्या सुरस कथा आपण ऐकत असतो. मात्र त्या तुलनेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना तेवढा मानसन्मान मिळत नाही. त्यांचं अर्थव्यवस्थेतील स्थान लक्षात घेतले जात नाही. हा समज बदलण्यासाठी आणि या उद्योगक्षेत्राचे महत्त्व जगाला समजण्यासाठी 27 जून हा दिवस, जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिवस म्हणून साजरा केला जातो. 2017 साली, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, हा दिन साजरा करण्याचा ठराव संमत करण्यात आला. अशा उद्योगांच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला पाठबळ देण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
अनेक वर्षे लघु उद्योग म्हणजे, महिलांचा पापड, लोणची मसाले असा कुटिरोद्योग एवढाच त्याचा मर्यादित अर्थ घेतला जाई. त्यानंतर, मोठ्या उद्योगांना सुटे भाग किंवा काही कच्ची उत्पादने पुरवणारे उद्योग म्हणून त्याकडे बघितलं जाऊ लागलं. हे एक स्वतंत्र आणि अर्थव्यवस्थेत मोठी भर घालणारे क्षेत्र आहे, मोठी रोजगारनिर्मिती करणारे आणि कलात्मकता, कौशल्ये यांना वाव देणारे क्षेत्र आहे, असा विचार आता अलीकडे रुजायला लागला आहे. विशेषतः गरिबी निर्मूलन, अर्धशिक्षित कुशल, अर्धकुशल हातांना काम देणारे हे क्षेत्र आहे. अनेक क्षेत्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे स्थान महत्वाचे आहे. मग ते वाणिज्य असो किंवा उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र किंवा कृषी संलग्न क्षेत्र.हे उद्योग स्वयं रोजगाराला, उद्यमशीलतेला प्रोत्साहन देतात.
भारताचा विचार केल्यास, आज देशभरात 3.64 कोटींपेक्षा अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत यापैकी सुमारे 17 कोटी उद्योगांची नोंदणी एम एस एम ई मंत्रालयाच्या उद्यम पोर्टल वर झालेली आहे. या सर्व उद्योगांना मदत करण्यासाठी उद्यम पोर्टल विकसित करण्यात आले असून त्यावर नोंदणी आणि कर्ज तसेच इतर सुविधांची माहिती दिली जाते.
यावर्षीच्या एम एस एम ई दिनाची संकल्पना, “एका मजबूत भविष्याची एकत्रित उभारणी करुया” अशी आहे. जगभरात विखुरलेल्या या लघु उद्योगांना एकत्रित ताकद देणे, त्यांच्यात एक साखळी निर्माण करणे, यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच, ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या ना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी ही प्रयत्न व्हायला हवेत. लघु उद्योगांसमोर सर्वात मोठी समस्या असते ती भांडवल उभारणीची. ही समस्या दूर होण्यासाठी सरकारकडून विनातारण कर्ज हमी योजना आणली गेली आहे. त्याशिवाय, मोठ्या उद्योगांनी लघु उद्योगांची बिले थकवू नयेत, याचीही तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय, अशा उद्योगांना परवडणाऱ्या दरात आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे ही आवश्यक आहे.
खरं तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्याच म्हणायला हव्यात. देशाचं अर्थकारण सुरळीत चालायचं असेल, तर ह्या रक्तवाहिन्या कायम प्रवाही राहिल्या पाहिजेत. यासाठी, या वाहिन्यांमध्ये येणारे अडथळे दूर करण्याचा संकल्प या निमित्ताने करुया.
RG/ML/PGB 17 Jun 2024