ठाण्यात 1 क्विंटलहून अधिक प्लॅस्टिक जप्त
ठाणे दि.26 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत हाती घेण्यात आलेल्या कारवाई मोहिमेअंतर्गत एकूण 102 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून 38 हजार 450 रु. इतका दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई मंगळवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईअंतर्गत विविध प्रभागसमितीतील दुकाने व आस्थापना यांचेकडून सिंगल युज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून 99 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 9 हजार रुपये दंड, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार 500 रुपये दंड, दिवा प्रभाग समिती क्षेत्रातून 10 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 3 हजार 500 रु दंड, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातून 09 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार रु. दंड, नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 7 हजार रु. दंड, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातून 10 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार रु. दंड, लोकमान्य सावरकर प्रभागसमितीक्षेत्रातून 9 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 5 हजार 700 रु. दंड, वागळे प्रभाग समिती क्षेत्रातून 13 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 7 हजार 250 रु. दंड, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 2 हजार 500 रु.दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या 9 प्रभागसमिती क्षेत्रातून एकूण 38 हजार 450 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
सिंगल यूज प्लॅस्टिकबाबतची कारवाई ही नियमित सुरू राहणार असून नागरिकांनी देखील सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा व दुकानदारांनी देखील सिंगल यूज प्लॅस्टिकची विक्री करु नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
SW/ML/SL
26 June 2024