काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणूनच…
बुलडाणा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील चिखली नजीकच्या मेहकर फाट्यावर खाजगी लक्झरी बसने पेट घेतला सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही परंतु लक्झरी बस पूर्णतः जळून खाक झाली. चंद्रपूर येथून लग्न समारंभ आटपून ही वऱ्हाडी मंडळी घेवुन बुलढाण्याकडे येत होती.
आज 25 जूनच्या सकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मेहकर फाटा येथे चहा घेण्यासाठी उतरली होती. ते प्रवास करत असलेली खाजगी बस उभी असताना गाडीमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणातच ही खाजगी बस पूर्णतः पेटली, बसमधील सर्व प्रवासी हे चहा घेण्यासाठी खाली उतरलेले असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली यामध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही. चिखली येथील अग्निशामक दलाच्या पथकाने येऊन ही खाजगी बसची आग विझवली.