जागतिक योग दिन : योग स्वतःसाठी आणि समाजासाठीही

आज जगभरात दहावा योग दिन साजरा होत आहे. बरोबर दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर मांडलेला योगदिनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. जवळपास 177 देशांनी ह्या प्रस्तावाला समर्थन देत, 21 जून हा योगदिन निश्चित करण्यात आला. 21 जून हा ग्रीष्म संक्रांतीचा दिवस मानला जातो या दिवशी दिवस सर्वात मोठा असतो आणि या दिवसापासूनच सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं. हे लक्षात घेऊन 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले.
तेव्हापासून दरवर्षी जगभरात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. अर्थातच, भारत योगदिनाच्या उत्सवाचा केंद्रबिंदू आहे.
योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने गीतेतून जगाला योग: कर्मसु कौशलम् हा मंत्र देत योगविद्येचे महत्व सांगितले. पतंजली मुनींनी योगविद्येची सूत्रे सांगत त्यांचे आचरण शिकवले. भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर यांनीही त्यांच्या जीवनात योगशास्त्र आचरणात आणले. तेव्हापासून ही अखंडित परंपरा भारतात सुरू आहे आणि या परंपरेकडे आपण लक्ष देऊन पाहिले तर आपल्याला कळतं की योग केवळ एक व्यायाम प्रकार नाही, एक प्राणायामाची साधना नाही तर आपलं व्यक्तिमत्व घडवून युज म्हणजे आपल्यातल्या परमात्म्याशी आपल्याला जोडण्याचं ते एक आध्यात्मिक साधन आहे.
अर्थात सर्वसामान्य माणसांचा हा हेतू असेलच असं नाही. पण किमान शरीर मनाचे संतुलन साधून निरोगी शरीर आणि सुदृढ मन, पर्यायाने उत्तम जीवन जगण्याचा हा मार्ग आहे, एवढं लक्षात घेऊनही योगाभ्यास अंगिकारला तरी उत्तम आहे. जगभरात अनेक देशांनी योगाचे हे महत्त्व ओळखून योगाभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. विशेष म्हणजे गेली दहा वर्षे हे उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.
यंदा देशात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम निसर्गरम्य काश्मीरच्या डल लेक जवळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे सर्वांसोबत योगाभ्यास केला आणि योगाचे महत्त्वही सांगितले. देशभरात लोकांनी, विविध संस्थांनी योगदिना निमित्त उपक्रम साजरे केले. यंदाच्या योगदिनाची संकल्पना ‘ योग स्वतः साठी आणि समाजासाठीही ‘ ही आहे. ‘ व्यक्तीकडून समष्टीकडे ‘ असा संस्कार असलेल्या भारतात, ही संकल्पना योगशास्त्राचा समाजासाठी उपयोग करण्याची प्रेरणा देते. केवळ आपलेच नाही, तर समाजाचे भले करुया. प्रत्येकाला योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देत एकेक माणूस जोडून संपूर्ण समाज सुदृढ करण्याचा हा व्यापक विचार आहे.
दहा वर्षानंतर योगादिनाचा उत्सव आणि योगाभ्यास करण्याचे नव्या पिढीतही वाढत चाललेले आकर्षण पाहून समाजासाठी योग ही यंदाची संकल्पना आपण प्रत्यक्षात साकार करू, असा विश्वास वाटतो. जागतिक योगदिनाच्या निरोगी शुभेच्छा !!
राधिका अघोर