४ हजारांहून अधिक कोट्याधीश भारताला ठोकणार रामराम

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन दशकांपूर्वी देशाला ‘ब्रेनड्रेन’ म्हणजे देशातील मध्यमवर्गीय बुद्धीमान व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात देश सोडून रोजगाराच्या शोधात परदेशात जाण्याची समस्या भेडसावत होती. आता गेल्या काही वर्षांपासून देशातील कौट्यधीशांनी भारत सोडून परदेशांकडे वळण्याचा ट्रेंड वाढला आहे. यावर्षी ४ हजार ३०० भारतीय कोट्याधीश नागरिक देशाला रामराम ठोकून इतर देशात जाणार असल्याचा ताजा अहवाल समोर आला आहे. यापैकी बरेचसे धनाढ्य आखाती देशांची निवड करण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. लंडनच्या ‘हेन्ली अँड पार्टनर्स’ या गुंतवणूक सल्लागार संस्थेने या संबंधी एक अहवाल प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अहवालात असेही नमूद केले आहे की, कोट्यधीश नागरिक स्वतः जरी स्थलांतरीत होत असले तरी त्यांच्या व्यवसायाचे केंद्र आणि त्यांचे भारतातील घर मात्र कायम ठेवत आहेत. यामुळे त्यांना आर्थिक घेवाणदेवाण करणे सुलभ होते.
मागच्यावर्षी ५ हजार १०० कोट्यधीश भारतीय नागरिक देश सोडून इतर देशांत स्थलांतरित झाले होते, असा अहवाल याच संस्थेने दिला होता. वेगाने अर्थव्यवस्थेत प्रगती होणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. चीन आणि UK नंतर कोट्यधीशांचे स्थलांतर होणाऱ्या देशांमध्ये भारताचा आता तिसरा क्रमांक लागत आहे. तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताना चीनलाही मागे टाकले आहे. मात्र कोट्यधीशांच्या संख्येत भारत अजूनही चीनच्या मागे आहे. भारतात चीनपेक्षा ३० टक्के कमी कोट्यधीश आहेत.
भारत दरवर्षी हजारो कोट्यधीश गमवत आहे. यातील बरेचसे लोक आखाती देशांना आपलेसे करत आहेत. कोट्यधीश भारताबाहेर गेल्यानंतर त्यांच्याबरोबर ते संपत्तीचेही स्थलांतर करतात. स्थलांतरामुळे अनेक कोट्यधीश नागरिक भारताने गमावले असले तरी आर्थिक प्रगतीचा वेग वाढल्यामुळे आणखी कोट्यधीश निर्माण करण्यात भारताला यश आलेले आहे, असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.
ML/ML/SL
19 June 2024