सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट
जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारच्या शिष्टमंडळाने आज ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातील सदस्य असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी हाके आणि वाघमारे यांच्या सोबत चर्चा केली. उद्या राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होणार आहे. त्याबैठकित आम्ही तुमची मागणी मांडू असं आश्वासन यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने उपोषणकरत्यांना देण्यात आले.
उपोषणकर्त्यानी त्यांचं उपोषण सोडून मुंबईत उद्या होणाऱ्या बैठकीसाठी यावं अशी मागणी यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी यावेळी केली. मात्र आम्ही उपोषण सोडून चर्चेला येणार नाही असं म्हणत आम्ही आमचं शिष्टमंडळ चर्चेला पाठवू असं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे म्हणाले. जो पर्यंत सरकार आम्हाला ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही याचं लेखी आश्वासन देत नाही तो पर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
उपोषणकर्ते हाके आणि वाघमारे यांची प्रकृती खराब झाली असून त्यांनी पाणी प्यावे अशी विनंती यावेळी शिष्टमंडळाने केली. मात्र जो पर्यंत लेखी आश्वासन पत्र मिळत नाही तो पर्यंत आमरण मागे न घेण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. दरम्यान आम्ही चर्चेसाठी तयार असून आम्ही आमचं 5 सदस्यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवू अशी प्रतिक्रिया यावेळी बोलतांना उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी दिली.
ML/ML/PGB 17 Jun 2024