फादर्स डे…!

आजचा दिवस, म्हणजे जूनमधील तिसरा रविवार, अमेरिकेत फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. याला मुद्दामच ‘पितृदिन’ वगैरे म्हणून आपल्या भाषेत आणण्याचा घाट घातलेला नाही, कारण मुळात जी संकल्पनाच आपल्या संस्कृतीत नाही, तिला आपल्या भाषेत शब्द तरी कसा असेल? म्हणून, बाजारपेठेत मोठी उलाढाल करणारा हा पाश्चिमात्य ‘सण’ नि त्याचे ‘फादर्स डे’ हे नाव, दोन्ही तसेच ठेवून त्याबद्दल लिहू, वाचू, विचार करू.
अमेरिकेत एका सैनिकाच्या मुलीने – तिचे नाव सोनोरा- हिने १९०९ मध्ये चर्चच्या पाद्र्यांच्या संघटनेकडे दाखल केलेल्या याचिकेवरून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. हिच्या सैनिक पित्याने यादवी युद्धातून परतल्यावर एकट्याच्या हिंमतीवर सहा अपत्यांचे पालनपोषण केले. त्याबद्दलच्या कृतज्ञ भावनेतून आणि त्याच्या कामगिरीची प्रशंसा व्हावी या उद्देशाने सोनोराने ‘पित्याप्रती कृतज्ञता प्रकट करणारा फादर्स डे साजरा व्हावा’, अशी याचिका दाखल केली. त्यामुळे १९१० पासून तो साजरा तर होऊ लागला परंतु त्यास प्रसिद्धी मिळाली ती राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या एका भाषणामुळे.
१९१६ मध्ये एका समारंभात त्यांनी केलेल्या त्या भाषणामुळे फादर्स डे च्या सुट्टीकडे अमेरिकी जनतेचे लक्ष वेधले गेले. पुढे १९६६ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्षांच्या घोषणापत्रामुळे या दिवसाची लोकप्रियता वाढली. आणि १९७२ मध्ये तर जूनचा तिसरा रविवार अधिकृतरीत्या फादर्स डे म्हणून घोषित होऊन अमेरिकेत राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता पावला.
जागतिकीकरण ही फक्त वस्तू आणि सेवांच्या उत्पादन तथा विक्रीशी संबंधित संकल्पना नाही. तर त्यात सांस्कृतिक पैलूही विचारात घेतले पाहिजेत. इतर अनेक पाश्चिमात्य कल्पना आणि विचारांप्रमाणे नात्यांना समर्पित दिवस साजरा करण्याचाही विचार जागतिकीकरणानंतर भारतात रुजू लागला. साधारण २०००-२०१० या दशकाच्या सुरुवातीला फादर्स डे साजरा करण्याचा भारतातही पायंडा पडला, आणि या दशकाच्या अखेरपर्यंत हे खूळ भारतात चांगल्यापैकी पसरले. अर्थात, तसे पसरण्यात बाजारपेठेचा सर्वात मोठा हात होता. यामागील अर्थकारण सोपे आहे – त्या निमित्ताने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत अनेक वस्तूंचा महापूर बाजारात आणता येतो, अनेक हातांतून खेळत खेळत बड्या कंपन्यांकडे जाऊन पैसा स्थिरावतो आणि मग बाजारपेठा नवीन सणाची वाट बघायला सिद्ध होतात.
पैशाची मोठी उलाढाल व्हायलाही हरकत नाही, गणपती/ दिवाळीत होतेच की ! परंतु, ती ज्या कारणाने होते, ते कारण सांस्कृतिकदृष्ट्या ‘आपले’ आहे का, याचा विचार करायला हवा. जन्मदात्या किंवा पालनकर्त्या पित्याबद्दल वर्षातून एकच दिवस उमाळा? त्याला भेटवस्तू आणि शुभेच्छापत्र देऊन, विकतच्या वस्तूंनी, यांत्रिक पद्धतीने एक दिवस कृतज्ञता व्यक्त करायची? किती बेगडी आहे हे सारे ! केक कापून मेणबत्त्या विझवून वाढदिवस साजरा करण्याइतकेच हेही पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
जन्मदात्या किंवा पालनकर्त्या पित्याचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्याचे सर्वस्व पणाला लावून तो आपले जीवन सार्थ करण्यासाठी धडपडतो. आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या बळ देत राहतो. घराचे घरपण जपतो. तो आपल्या अस्तित्वाचा आधार असतो. म्हणूनच, त्याच्याबद्दल भारतीय धाटणीच्या मनात दाटणाऱ्या कृतज्ञता, आदर, प्रेम अशा भावनांना ना अंत ना पार!
‘पितृ देवो भव’ ही आपली संस्कृती. ‘आईवडिलांना प्रदक्षिणा हीच पृथ्वीप्रदक्षिणा’ हे मर्म ओळखणाऱ्या गणेशाला आपल्याकडे अग्रपूजेचा मान ! पित्याच्या शब्दाचा मान राखण्यासाठी क्षणात वनवास पत्करणाऱ्या श्रीरामाची ही भूमी. पित्याच्या हाकेसरशी महाभारतीय युद्धात उडी घेऊन प्राणांची आहुती देणाऱ्या घटोत्कचाचा हा देश. पितृसेवेत व्यत्यय येऊ नये यासाठी साक्षात् पांडुरंगालाही विटेवर तिष्ठत उभा करणाऱ्या पुंडलिकाचे गुणगान करणारा हा देश.
पुत्रांकडून होणाऱ्या अशा आदर्श आचरणांच्या मांदियाळीत, पित्याकडूनही या नात्याची वीण कशी घट्ट आहे बघा ना- भर पावसाच्या वादळी रात्री फुसांडत वाहणाऱ्या यमुनेची तमा न बाळगता, केवळ पुत्राला सुखरूप ठेवण्यासाठी ती ओलांडणाऱ्या वसुदेवाचा हा देश. ‘पुत्राच्या कर्तृत्वाने स्वराज्याचे तोरण बांधले जावे’ अशा दूरदृष्टीने त्यास राजमुद्रा भेट देणाऱ्या शहाजीराजांची ही भूमी. ‘चप्पल शिवलीस तरी चालेल, पण ती जगात सर्वोत्तम शिवली पाहिजेस’, असा सल्ला आपल्या मुलाला देणाऱ्या लोकमान्यांचा हा देश.
अशा देशातील आजच्या पिढीने, वाहावत जाऊन ‘एक(च) दिवस वडिलांचा’ इतपत मान्य तरी का करावे? कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला एका ठराविक दिवसाची गरज नाही हो! तो भाव आपल्या पिढ्यानुपिढ्यांच्या रक्तात वाहतो आहे, तो आदर आपल्या रोमारोमात भिनला आहे.
हां, आता यावर असाही युक्तिवाद होऊ शकतो – ‘वर्षभर गोड बोलायचे असले तरी, संक्रांतीला तीळगूळ देतोच ना, मग फादर्स डे साजरा करायला काय हरकत आहे?’- ठीक आहे ना, साजरा करण्यात काहीच वावगे नाही, फक्त तो आनंद – बाजारपेठेने पसरलेल्या मोहजालावर अवलंबून नसावा. तर तो विचारपूर्वक डोळसपणे साजरा व्हावा.
वडिलांनी दिलेला एखादा संस्कार ‘जगून’ दाखवला की खरा ‘पितृदिन’ साजरा होतो! मग तो जूनच्या तिसऱ्या रविवारचा फादर्स डे नसला तरी चालेल! याचे एक छान उदाहरण वायुदलात पाहायला मिळते. भारतीय वायुदलाची फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा हिने जुलै २०२२ मध्ये एअर कमोडोर संजय शर्मा यांच्या- म्हणजे तिच्या पित्याच्या – फॉर्मेशनमध्ये युद्धविमान उडवले. तेव्हा त्या पितापुत्रीच्या जोडीने इतिहास घडवला आणि अधिक शाश्वत अर्थाने पितृदिन साजरा केला. अशी उदात्त उदाहरणे आवर्जून शोधली पाहिजेत आणि आपल्यातूनही घडवली पाहिजेत. तेव्हाच ते पितृत्वाचे बहुपेडी नाते येत्या पिढ्यांसमोर उलगडत जाईल !
— जाई वैशंपायन.