महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणूकीत ललीत गांधींचा वरचष्मा
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर या महाराष्ट्रातील शिखर संस्थेची द्विवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये कोकण विभागातून उपाध्यक्ष म्हणून मसुरे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक श्रीकृष्ण परब यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे गव्हर्नींग कौंसिल मेंबर म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळ येथील राजन सुरेश नाईक, बांदीवडे गावचे मिलींद प्रभू, कुडाळ येथील मनोज वालावलकर, वेंगुर्ला येथील ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर, कुडाळ येथील शिवाजी घोगळे यांची बिनविरोध निवड झाली.
गव्हर्नींग कौंसिल मेंबर्सची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी यशस्वी शिष्टाई केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या वरिष्ठ उपाध्यक्षासह अनेक पदांची उर्वरीत महाराष्ट्रात निवडणूक झाली असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मतदान झाले. या झालेल्या मतदानामध्ये उद्योगपती अनिल गचके यांच्या विरोधात उभे असलेले प्रसिद्ध उद्योजक रवींद्र माणगावे हे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून प्रचंड मतांनी विजयी झाले. तर महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदासाठी कोल्हापूर येथील ललित गांधी यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्र चेंबरच्या द्विवार्षिक निवडणुकीत नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी प्रणित “शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनल” च्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी रवींद्र माणगावे यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातून उपाध्यक्ष पदी संजय सोनवणे , संगीता पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मुंबई विभागातून उपाध्यक्षपदी करुणाकर शेट्टी भरघोस मतांनी विजयी झाले. पश्चिम महाराष्ट्रातून उपाध्यक्षपदी दिलीप गुप्ता , रमाकांत मालू यांची बिनविरोध निवड झाली तर कोंकण विभागातून उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण परब यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणूकीमध्ये ललीत गांधी प्रणीत “शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनल” तर चेंबरचे सर्व माजी अध्यक्ष पुरस्कृत “एकता पॅनल” एकामेकांसमोर उभे होते.
या मध्ये “शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनलने घवघवीत यश संपादित केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर या संस्थेला 97 वर्ष पूर्ण झाली असून लवकरच चेंबरचे शतक महोत्सव साजरे होणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याला “महाराष्ट्र” हे नाव राज्य निर्मीतीपूर्व असलेल्या “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स” च्या नावातील आद्याक्षरावरुन घेतले असल्याचे संस्थेच्या तसेच महाराष्ट्र राज्याच्या दप्तरी त्याची नोंद आहे.
ML/ML/SL
15 June 2024