वणी तालुक्यात आढळले सातवाहन काळातील अवशेष
यवतमाळ, दि.१०( आनंद कसंबे) : यवतमाळ जिल्हयाला अत्यंत पुरातन इतिहास लाभलेला आहे.जिल्हयातील वणी येथील पुरातत्व आणि इतिहासाचे अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांना वणी तालुक्यातील मंदर गावा जवळील धंदर शिवारात अभ्यास करतांना काही पुरातन वस्तू आढळल्या. याचवेळी त्यांनी स्थानिक शेतक-यांना याबाबत विचारणा केली असता , आम्हाला शेत नांगरतांना अशा वस्तू नेहमीच आढळत असल्याचे सांगीतले. तेव्हा अधिक चौकशी केल्यावर काही नाणी सापडल्याचेही शेतक-यांनी सांगीतले. सदर नाण्यांवर लिहीलेली अक्षरे वाचण्यासाठी इतिहास मंडळाकडे पाठविली असता ही नाणी तब्बल 1800 वर्षापुर्वीची असल्याचे सिध्द झाले .
ही नाणी इसवी सन तिस-या शतकातील पश्र्चिम क्षत्रप राजाची असून त्यांना ड्रेक्मा असे म्हटले जाते. अर्थातच हा काळ सातवाहन राजवटीचा होता. याचसोबत येथे आढळलेल्या वस्तुंमध्ये तत्कालीन राजाचा मुखवटा अर्थातच मुर्ती , भाजलेल्या विटा, पाणी साठवण्याच्या भांडयाचे म्हणजे माठाचे अवशेष, दिव्यांचे अवशेष, पाळीव प्राण्यांची हाडे, दात, स्त्रियांची टेराकोटांची माळ, बाजुबंद वगैरे दागीने आढळली आहेत. काही शिल्पांचे निरीक्षण केले असता त्यावेळच्या स्त्रियांचा पुरुषांचा पेहेराव कोणता होता हे सुध्दा दिसुन येत आहे.
यासोबत घरात वापरायचा पाटा, वरवंटा अशा दगडी वस्तुही आढळल्या आहेत. याशिवाय त्यावेळेसच्या सरपंच अथवा गावप्रमुख वा राजा , जो कोणी प्रमुख असेल त्यांची सभा घेण्याची जागा अर्थातच खुले सभागृह सुध्दा आढळले आहे. येथे सापडलेल्या विटांवरुन येथील गावातील श्रीमंत लोकांची घरे विटांची असल्याचे सिध्द होते. तर आजुबाजुला गरीबांची घरे मातीची होती.कालांतराने काही कारणाने गावे उध्वस्त झाली. उजाड झाली, आणि मातीच्या ढिगा-यात गाडल्या गेली. आज यावर येथील गावकरी शेती करीत आहेत.
या वस्तु साध्या नांगरतांना एकदोन फुट खोलवर सापडतात, जर येथे 5 ते 6 फुट खोदकाम केले तरी आणखी बरंच काही सापडू शकते असा दावा प्रा.सुरेश चोपने यांनी केला आहे. पाणी पिण्यासाठी म्हणा वा शेतीसाठी म्हणा परंतु पाणी साठविण्याच्या उद्देशाने परिसरातच दोन मोठमोठे तलाव निर्माण केले आहेत. हे तलाव सुध्दा त्याच कालखंडात निर्माण केले आहेत.
तलावातील पाणी वाहुन जावू नये यासाठी उताराच्या बाजुने भव्य दगडांचा बंधारा बांधण्यात आला आहे. अशा प्रकारचा बंधारा नंतरच्या काळात कोणीही बांधला नाही हे विशेष. तब्बल 1800 वर्षापुर्वी म्हणजे दुस-या शतकातील लोकांचे जीवनमान, त्यावेळची शेती, व्यापार उदीम, सार्वजनिक जीवन, शिक्षण पध्दती, कला संस्कृती इ. बाबत पुराव्यासहीत माहिती होण्यासाठी या परिसराचे उत्खनन होणे गरजेचे आहे.
AK/ML/SL
10 June 2024