आयकर घोटाळ्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या पतीच्या नावे कोट्यवधीची माया

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईडीने मुंबईमधुन 263 कोटींच्या प्राप्तिकर परतावा फसवणूकीच्या हायप्रोफाईल प्रकरणाची पोलखोल केली आहे. या प्रकरणी मुंबईतील महिला IPS अधिकाऱ्याचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना अटक केली होती. या प्रकरणात ईडीला आता मुंबई आणि ठाणे येथे त्यांच्या नावे असलेल्या 14 फ्लॅट्सची कागदपत्रे सापडली आहेत. यामध्ये वरळीतील तीन हजार चौरस फूट आणि सोळाशे चौरस फूट आकाराच्या दोन मोठ्या फ्लॅट्सचा समावेश आहे. पती पुरुषोत्तम चव्हाण आणि अन्य नातेवाईकांच्या नावे या महिला पोलीस अधिकाऱ्यांने 150 कोटींची मालमत्ता नोंदणीकृत केल्याचेही ईडीच्या तपासात उघडकीस आले आहे.त्यांच्या सदनिकेत राबवण्यात आलेल्या शोध कार्यात मालमत्ताविषयक कागदपत्रांबरोबरच परदेशी चलन व मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.
बॅलार्ड इस्टेट ईडी कार्यालयात जबाब नोंदवण्यासाठी महिला अधिकाऱ्याचे ऑर्डरली आणि ड्रायव्हरसह अन्य कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चव्हाण यांच्या सूचनेनुसार या प्रकरणातील दुसरा आरोपी व्यापारी राजेश बत्रेजा याच्याकडून रोख रक्कम आणि इतर कागदपत्रे गोळा केल्याची कबूली या चौकशी दरम्यान चालक आणि ऑर्डरी यांनी दिली आहे.
प्राप्तीकर घोटाळा प्रकरणी ईडीने गेल्या वर्षी माजी प्राप्तिकर (आयटी) अधिकारी तानाजी मंडल अधिकाऱ्यांना अटक केली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, आयकर विभागाच्या मुंबई कार्यालयात असताना त्यांनी 263 कोटी रुपयांचा बनावट टीडीएस परतावा तयार केला. या प्रकरणात यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यात तानाजी अधिकारी, भूषण पाटील आणि राजेश शेट्टी हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत तर राजेश ब्रिजलाल बत्रेजा हे ईडी कोठडीत आहेत. पाटील, शेट्टी आणि बत्रेजा हे तानाजी अधिकाऱ्यांचे सहकारी आहेत. याच घोटाळ्याप्रकरणी मनी लॉड्रिग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार पुरुषोत्तम चव्हाणलाही अटक केली आहे.
या घोटाळ्यातील पुरुषोत्तम चव्हाण यांच्या भूमिकेबाबत सांगताना ईडी अधिकारी म्हणाले की, सध्या ईडी कोठडीत असलेला बत्रेजा आणि चव्हाण नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच हवाला व्यवहार आणि गुन्ह्यातील रक्कम वळवण्याशी संबंधित माहिती एकमेकांना देत होते. चव्हाण यांनी पुरावे नष्ट करून तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा ईडीचा आरोप आहे.
SL/ML/SL
31 May 2024