कॉसमॉस बँकेला मार्च २०२४ अखेर ३८४ कोटींचा विक्रमी निव्वळ नफा

मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क) : कॉसमॉस बँकेला मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ३८४ कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा झाला असून बँकेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वोच्च निव्वळ नफा असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
बँकेच्या आर्थिक प्रगतीबद्दल सविस्तर माहिती देताना सीए काळे पुढे म्हणाले की, मार्च २०२४ अखेर बैंकेने ठेव संकलन, कर्ज वितरण, करपूर्व नफा, निव्वळ नफा, सीआरएआर तसेच नेट एनपीएचे प्रमाण इ. सर्व आघाड्यांवर उत्तम कामगिरी केली आहे. मार्च २०२४ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय रूपये ३५,४०८ कोटी झाला असून यामध्ये गतवर्षीपेक्षा म्हणजेच मार्च २०२३ पेक्षा एकूण ४,६६२ कोटी रूपयांची वाढ झाली. या वाढीचे प्रमाण १५.१६% आहे. बँकेच्या एकूण ठेवी २०,२१६ कोटींवर पोहोचल्या असून यामध्ये गतवर्षीपेक्षा २,५८७ कोटींची वाढ झाली आहे. बँकेचे कर्जवितरण १५,१९२ कोटी झाले असून यामध्ये एकूण गतवर्षीपेक्षा २,०७५ कोटींची वाढ झाली आहे. बँकेचे ढोबळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) ३.२२% असून निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) १.५४% आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) १५.४३% आहे. बँकेला मार्च २०२४ अखेर ४६१ कोटींचा करपूर्व नफा झाला असून ३८४ कोटींचा विक्रमी निव्वळ नफा झाला आहे.
मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने मुंबईमधील मराठा सहकारी बँक (७ शाखा) आणि साहेबराव देशमुख सहकारी बँक (११ शाखा) या दोन बँकांचे विलीनीकरण करून घेतले. सदर विलीनीकरणामुळे मुंबईसारख्या एकाच शहरामध्ये सर्वात जास्त अशा बँकेच्या ५० शाखा कार्यरत झाल्य आहेत. कॉसमॉस बँकेच्या ७ राज्यात एकूण १७० शाखा आहेत. बँकेने आत्तापर्यंत एकूण १८ लहान सहकारी बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे. या विलीनीकरणामुळे लाखो ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्ष झाले आहे, अशी माहिती बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रविणकुमार गांधी यांनी दिली.
नवीन शाखा विस्ताराबाबत माहिती देताना बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. अपेक्षिता ठिपसे म्हणाल्या की, नुकतेच बँकेने पुण्यामध्ये मांजरी, ताथवडे आणि रावेत येथे नवीन शाखा सुरू केल्या असून,त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नजीकच्या काळात पुण्यात धानोरी येथे व मुंबईमध्ये वरळी,सायन, गिरगाव, विक्रोळी, कुर्ला येथे नवीन शाखा सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती सौ. ठिपसे यावेळी दिली.
SW/ML/SL
28 May 2024