स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पहावे वाकून ही आव्हाड यांची प्रवृत्ती …

ठाणे, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे अपघात प्रकरणी अजितदादांचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही डाॅ जितेंद्र आव्हाड हे अजितदादांबद्दल खोटे आरोप करीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांना स्वप्नात अजितदादाच दिसतात, कायम एका द्वेषाने ते अजितदादांबद्दल बोलतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पुण्याला जो दुर्दैवी अपघात झाला आणि जो निष्पाप तरुणांचा जो बळी गेला याच्यावरून महायुतीचे सरकार आणि महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही नेत्यांनी पुणे अपघात प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.अशी भूमिका घेतली आहे.
येरवडा पोलिस स्टेशनमधल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी केसच्या सुरुवातीला जो निष्काळजीपणा केला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे. ससून हाॅस्पिटलमधील दोन डाॅक्टर यांनी रक्ताचे सॅम्पल बदलले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. दोन्ही पोलीस अधिकार्यांना आणि डाॅक्टरांना अटक करण्यात आली आहे. ससून हाॅस्पिटलप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी सुरु करण्यात आली आहे. पण सातत्याने विरोधीपक्षातील नेत्यांना, महायुतीतील तीनही नेत्यांवर आरोप करण्याची जणू सवयच लागली आहे.खासकरुन ठाण्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते, माजी मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड यांना तर स्वप्नात कायम अजितदादाच दिसतात.
येनकेनप्रकारेन महाराष्ट्रात कुठेही कुठली दुर्घटना झाली की त्याचा संबंध अजितदादांशी लावायचा ही यांची नेहमीची सवय झाली आहे. कालच वक्तव्य करताना त्यांनी सांगितले की अजितदादांनी पुणे पोलीस आयुक्तांना किती वेळा फोन केला, काय बोलले याची चौकशी झाली पाहिजे. अजितदादांनी काल पत्रकार परिषद घेताना स्वतः हे सांगितले की मी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाई करा अशाप्रकारचे निर्देश दिले आहेत. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका, असे आदेश दिले आहेत.
माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे की याच अजितदादा पवार यांनी आपल्यासाठी ज्यावेळी ३५४ गुन्हा दाखल झाला. त्यावेळी आपल्यासाठीदेखील ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता.की आपण व्हिडिओ पूर्ण न बघता, चौकशी न करता आमचे सन्मानीय आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ चा गुन्हा कसा दाखल केलात ? हे आपण विसरलात का ? हरहर महादेवच्या वेळेला ज्यावेळेला तुम्हाला,आम्हाला, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनने अचानकपणे क्रिमिनल ॲमेंडमेंट ॲक्ट सेक्शन ७ /१९३२ लावला, त्यावेळी देखील तत्कालीन ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माननीय अजितदादा पवार हे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी फोन केला होता, हे आपण विसरलात का ?
येनकेनप्रकारेन अजितदादांशी संबंध जोडायचा अजितदादांवर कशी टीका करता येईल, हा तुमचा केविलवाणा प्रयत्न असतो. पुण्याचे ब्रम्हा बिल्डरबरोबर नाव जोडण्याचा प्रयत्न केलात. जितेंद्र आव्हाड आपल्याला फार फोटो क्लिक करायची सवय असते. नवनियुक्त ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना आपण ट्विट केले होते की, कळवा-मुंब्र्यामध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाचे फोटो मी पाठवतो. मी जितेंद्र आव्हाड यांना तिसऱ्यांदा आव्हान देत आहे की, कळव्याचे आपले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यालय हे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि मध्य रेल्वेच्या जागेवर उभे आहे, असा फोटो देखील आपण सौरभ राव यांना ट्विट करावा. माझी मागणी आहे, ठाण्याचे कलेक्टर, ठाण्याचे तहसिलदार, ठाणे महापालिका आयुक्त यांनी या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अनधिकृत कार्यालयाची दखल घ्यावी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर खोटेनाटे आरोप करणे ही जितेंद्र आव्हाड यांना नेहमीची सवय आहे. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पहावे वाकून ही त्यांची प्रवृत्ती आहे. कायम एका द्वेषाने ते अजितदादांबद्दल बोलत असतात. पहिल्यांदा तुमच्या अनधिकृत कार्यालयाचे फोटो प्रथम ट्विट करा, तुमच्यासाठी अजितदादांनी दोन दोनदा फोन केले होते, एका गुन्यात मी सहआरोपी असल्याने साक्षीदार आहे. यामुळे उगाचच अजितदादांवर टीका करणे बंद करा.
खरतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका अनेकदा मांडली आहे. यामुळे भुजबळ यांना लक्ष्य करणे चुकीचे आहे पण निलेश राणे तसेच नितेश राणे यानी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
माझी अंजली दमानिया यांना एक विनंती आहे, त्यांच्याबद्दल व्यक्तिशः मला खूप आदर आहे. पण ॲक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणे त्यांनी बंद करावेत. अजितदादांची नार्कोटेस्ट घ्यायची कुठलीही गरज नाही. अजितदादांनी स्वतः म्हटले होतै की, मी पोलीस आयुक्तांना फोन करुन सांगितले आहे की, पुणे अपघात प्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करा आणि जे दोषी आहेत त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारची सहानुभूती दाखवता कामा नये. त्यामुळेच आज तीन आरोपी जेलमध्ये आहेत. त्यामुळे कायद्याचे शासन महायुतीच्या राज्यामध्ये आहे. योग्य पद्धतीने सर्व कारवाई केली जात आहे. यामुळे अंजलीताईंना विनंती आहे की केवळ सनसनाटीसाठी नार्कोटेस्ट करायला पाहिजे असे कोणतेही आरोप त्यांनी करु नयेत, असा इशारा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.
ML/ML/SL
28 May 2024