रविवारी प. बंगालच्या किनारपट्टीला धडकणार ‘रेमल’ चक्रीवादळ
कोलकाता, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मान्सून आठवड्यावर येऊन ठेपला असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे रविवार २६ मे रोजी सायंकाळपर्यंत बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला रेमल’ चक्रीवादळ धडक देईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मान्सूनपूर्व हंगामात बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे पहिले चक्रीवादळ असून आतापर्यंत चालत आलेल्या प्रचलित प्रथेनुसार त्याला ‘रेमल’ असे नाव देण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत हा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परिवर्तित होईल आणि शनिवारी सकाळपर्यंत ती तीव्र रूप धारण करेल, तसेच रविवारी सायंकाळपर्यंत हे चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडक देईल, अशी माहिती हवामान खात्याच्या वैज्ञानिक मोनिका शर्मा यांनी दिली. या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर रविवारी वाऱ्यांची गती ताशी १०२ किलोमीटर इतकी असेल. या काळात पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोरम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूर या ठिकाणी रविवार आणि सोमवारी अतिवृष्टी होईल, असा इशाराही त्यांनी दिला. समुद्राच्या पृष्ठभागातील तापमान सातत्याने वाढत असल्याने चक्रीवादळाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ते अधिकाधिक तीव्र होत आहे, असे मोनिका शर्मा यांनी सांगितले.
बंगालच्या उपसागरातील हे पहिले मान्सूनपूर्व चक्रीवादळ असून हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नावे देण्याच्या पद्धतीनुसार त्याचे नाव रेमल ठेवण्यात येणार आहे. IMDच्या रिपोर्टनुसार, रविवारी या चक्रीवादळामुळे ताशी १०२ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये २६-२७ मे रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना २७ मेपर्यंत किनारपट्टीवर परत जाण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
समुद्राच्या पृष्ठभागाच्या उष्ण तापमानामुळे चक्रीवादळे वेगाने तीव्र होत आहेत आणि त्यांची क्षमता दीर्घकाळ टिकवून ठेवत आहेत, परिणामी महासागरांनी हरितगृह वायू उत्सर्जनातून बहुतेक अतिरिक्त उष्णता शोषून घेतली आहे. १८८० मध्ये नोंदी सुरू झाल्यापासून गेल्या ३० वर्षांत समुद्राच्या पृष्ठभागाचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डी. एस. पै यांच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, समुद्राच्या पृष्ठभागावरील उबदार तापमानाचा अर्थ अधिक आर्द्रता आहे, जे चक्रीवादळांच्या तीव्रतेसाठी अनुकूल आहे.
SL/ML/SL
24 May 2024