डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू, ६५ गंभीर जखमी

डोंबिवली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोंबिवली MIDC तील केमिकल कंपनीत आज दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा प्रचंड स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झाले. या घटनेत आत्तापर्यंत ८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत होते. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्याची माहिती घेतली आणि पुढील निर्देश दिले आहेत. मानवी जीविताला हानीकारक ठरणाऱ्या डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अतिधोकादायक कंपन्यांना पर्याय म्हणून त्यांनी आपल्या कंपनी उत्पादन प्रक्रियेत अभियांत्रिकी, कापड किंवा अन्य बदल करून ते आहे त्या जागेत चालू ठेवावेत. असे बदल ज्यांना करायचे नसतील त्यांनी शहरा बाहेर शासनाने भूसंपादित केलेल्या जागेत स्थलांतरित व्हावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी माध्यमांशी संवाद साधताना दिले आहेत.
राज्यातील एमआयडीसींमधील कंपन्यांची आता अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण, औद्योगिक, औद्योगिक सुरक्षा, कामगार विभाग यांना दिल्या आहेत. या वर्गवारीप्रमाणे त्या भागात त्या कंपन्या ठेवायच्या की नाही हा लोकांच्या जीविताचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. डोंबिवली एमआयडीसीतील मानवी जीविताला हानीकारक अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद केल्या जात आहेत. ज्या कंंपन्यांना अतिधोकादायक कंपनीत माहिती तंत्रज्ञान, कापड, अभियांत्रिकी विषय उत्पादन प्रक्रिया सुरू करायच्या आहेत ते असे फेरबदल करून आपले उद्योग सुरू ठेऊ शकतात. पण ज्यांना आपल्या कंपनीत बदल करायचे नाहीत ते उद्योग शहराबाहेर शासनाने उद्योगांसाठी भूसंपादित केलेल्या जागेत स्थलांतरित केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मध्ये अंबर केमिकल कंपनीत दुपारी २ ते २.३० च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तीन ते चार किलोमीटर परिसरात जाणवले. यामुळे इमारतींच्या काचाही फुटल्या तसंच काही कार्संचंही नुकसान झालं आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. पूर्वाश्रमीची अंबर केमिकल म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी आता अमुदान केमिकल म्हणून ओळखली जाते. या कंपनीत यापूर्वीही स्फोट झाले होते.
SL/ML/SL
23 May 2024