उष्माघातामुळे ८५ माकडांनी गमावला जीव
मेक्सिको, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या जगभर आलेल्या उष्णतेच्या लाटांना मानवासह अन्य प्राणीमात्र देखील हवालदिल झाले आहेत. वन्यजीवांना या उष्णतेमुळे जीव गमावावा लागत आहेत. मेक्सिकोतील आग्नेय परिसरातील कोतमकाल्कोमधील जंगलात हॉऊलर प्रजातीच्या माकडांचा उष्माघातामुळे मृत्यू होत आहे. झाडांवरून फळे पडावीत, अशारीतीने ही माकडे खाली पडत असून त्यांच्या मृतदेहांचा जमिनीवर खच पडला आहे. यात आतापर्यंत ८५ माकडांनी आपला जीव गमावला आहे. हॉऊलर ही मेक्सिकोमधील माकडांची एक दुर्मीळ प्रजाती आहे. सध्या वाढलेले तापमान आणि मागील अनेक काळापासून पडलेल्या दुष्काळामुळे माकडांची अवस्था फार बिकट आहे.
या आठवड्यात तबास्को राज्यातील तापमान ४५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. १७ मार्चपासून ११ मेपर्यंत २६ लोकांचा उष्माघातामुळे जीव गेला आहे. दरम्यान, तबास्को सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीने उष्माघातामुळे माकडांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. तबास्को राज्यातील तीन महापालिकांनी माकडांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. वन विभागाचे कर्मचारी सध्या माकडांचे मृतदेह गोळा करत आहेत.
माकडांना वाचवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून ठिकठिकाणी पाण्याचे मोठे टब आणि फळांची व्यवस्था केली आहे. हाऊलर माकडाचा समावेश इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड लिस्टमध्ये करण्यात आला आहे. तबास्कोची दमट हवा दलदलीच्या, जंगलाने झाकलेल्या या राज्यातील लोकांसाठी, हॉऊलर माकड एक प्रेमळ, प्रतीकात्मक प्रजाती आहे; स्थानिक लोक म्हणतात की माकडे पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी ओरडून त्यांना दिवसाची वेळ सांगतात.
SL/ML/SL
22 May 2024