बीड मतदारसंघात १ हजार १७७ मतदान केंद्राचे वेब कास्टिंग
बीड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार असून यासाठी २ हजार ३५५ मतदान केंद्रे तयार आहेत. मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यापैकी ५० टक्के असे १ हजार १७७ मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण म्हणजेच वेब कास्टिंग होणार आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात येणा-या विधानसभा मतदार संघात अनुक्रमे गेवराई-१९९, माजलगाव-१८९, बीड-१९१, आष्टी-२२०, केज-२०७ आणि परळी-१७१ असे एकुण ११७७ मतदान केंद्रावर वेब कास्टींग होणार आहे या विधानसभा मतदारसंघात काही मतदान केंद्र हे संवेदनशील गटात मोडत असून अशा ठिकाणी वेब कास्टिंग ची सुविधा असणार आहे. यासह निश्चित झालेल्या ठिकाणी थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सकाळी ५:३० वाजेपासून ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेब कास्टिंग होणार आहे.
वेब कास्टिंगचे थेट प्रक्षेपण त्या विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात नियंत्रण असणार आहे. तर एकूण सहाही विधानसभा मतदार संघाचे थेट प्रक्षेपण हे जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या कक्षात दिसणार आहे. वेब कास्टिंग यंत्रणेद्वारे काही अनुचित प्रकार लक्षात आल्यास कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्यास तात्काळ त्या मतदान केंद्रावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
ML/ML/SL
12 May 2024