९.७५ कोटींचे अमली पदार्थ पोटात लपवणाऱ्या परदेशी व्यक्तीला अटक
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐकावं ते नवलच, अशी घटना आज महानगरी मुंबईत समोर आली आहे. विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीवरून कारवाई झाल्याच्या विविध घटना नेहमीच घडत असतात. सामानातून, कपड्यांमध्ये लपवून अशा प्रकारची तस्करी केली जाते. मात्र आज समोर आलेली घटना अचंबित करणारी आहे. हसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याच्या संशयावरून परदेशी नागरिकाला ताब्यात घेतले होते. या परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेनने भरलेल्या ११० कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. या कोकेनची किंमत सुमारे ९.७५ कोटी रुपये आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून यासंदर्भात डीआरआय अधिक तपास करत आहे.
जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन ९७५ असून त्याची किंमत सुमारे ९.७५ कोटी रुपये आहे. भारतात तस्करी करण्यासाठी अमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याचे आरोपीने चौकशीत कबुल केले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून यासंदर्भात डीआरआय अधिक तपास करत आहे.
परदेशी नागरिक मूळचा ब्राझिलमधील रहिवासी आहे. तस्करी करीत असल्याच्या संशयावरून त्याला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या पोटात अमली पदार्थ असल्याचा अधिकाऱ्यांना संशय होता. त्यामुळे त्याची वैद्याकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. जे. जे. रुग्णालयात त्याचा एक्सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात संशयित कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून या ११० कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.
SL/ML/SL
11 May 2024