बेस्टच्या कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईची वाहतूक प्रवासाची जीवनरेखा असलेल्या बेस्ट बसेसमध्ये ठेकेदारी पद्धतीवर कार्यरत असलेल्या वाहक आणि चालकांना बेस्ट प्रशासना कडून न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या या कामगारांनी सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त करीत आम्ही आता नेमके न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न मुंबई मराठी पत्रकार संघात उपस्थित करीत महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगर पालिका आयुक्त आणि बेस्ट प्रशासना विरोधात आपला संताप व्यक्त करीत लोकसभा निवडणुकी नंतर म्हणजेच 20 मे नंतर आम्ही संपावर जाणार असल्याचा इशारा कामगार नेते रघुनाथ खजुरकर यांनी दिला आहे.
यावेळी त्यांच्या सोबत सुनिल मधुकर खैरे, अनिल मनोहर जाधव, गणेश आनंदा भंडारे, गुरुप्रसाद बाळगृष्ण गवळी, रवि दगडू केदार, संदेश चंद्रकांत पवार, अंकुश जाधव, किरण पवार, आनंद प्रकाश धुटुकडे, शैलेश अपराहा तसेच प्रज्ञा खजुरकर आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी खजूरकर म्हणाले कि, आम्हा कामगारांशी पाच महिन्यापूर्वी १७ ऑगस्ट २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली.त्यावेळी त्यांनी तात्काळ बेसिक वेतनाची मागणी सोडल्यास तुमच्या सर्व मागण्या मान्य होण्यासारख्या आहेत असे म्हणत त्या मी मंजूर करण्यास सांगतो असे म्हटले.बेसिक वेतनाबाबत चर्चा करून नंतर तो विषय सोडवू, असे आश्वासन दिले. त्यानंतर या प्रकरणी अनेकवेळा नरेश म्हस्के यांच्यासोबत बैठका झाल्या, चर्चा झाली. आनंद आश्रम ठाणे टेंभी नाका येथे कंत्राटदारांना याबाबत म्हस्के यांनी सुचना देखील दिल्या. इतकेच नव्हे तर सहा.व्यवस्थापक यांच्यासोबत बेस्ट भवन कुलाबा येथे बैठका झाल्या. म्हस्के यांनी फोन वरून देखील संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना बेस्ट कंत्राटी कामगारांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यासंबंधी बजावले. तरीही याचा कोणताही फायदा झाला. आज पाच महिन्याचा कालावधी लोटला तरी याबाबत अद्यापही आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही असे स्पष्ट मत रघुनाथ खजुरकर यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी व्यक्त केले.
आता लोकसभा निवडणुकांचा कालावधी असल्याने २० मे पर्यंत आमच्या न्याय्य मागण्याबाबत बेस्ट प्रशासनाने आणि शासनाने विचार करावा, अन्यथा निवडणुकीनंतर सर्व कर्मचारी पुन्हा आंदोलन करतील. असा इशारा सरकारला दिला.
ML/ML/PGB 9 May 2024