रेल्वे मार्गालगतच्या धोकादायक झाडांच्या छाटणीची ५० टक्के काम पूर्ण

 रेल्वे मार्गालगतच्या धोकादायक झाडांच्या छाटणीची ५० टक्के काम पूर्ण

मुंबई दि.8 (एम एमसी न्यूज नेटवर्क): पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने पावसाळापूर्व खबरदारी म्हणून मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे सुरू आहेत. या कामांतर्गतच मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांलगत असलेल्या झाडांच्या देखील छाटणीला वेग देण्यात आला आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गालगत ५२ ठिकाणे मिळून एकूण २ हजार ४२४ झाडांची छाटणी करणे गरजेचे आहे. यातील ५० टक्क्यांहून अधिक झाडांची छाटणी पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित झाडांची छाटणीदेखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन वेगाने कामे करीत आहे. त्याच अनुषंगाने मध्य, पश्चिम आणि हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गालगतच्या झाडांची सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणी उद्यान विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे रुळांलगत धोकादायक ठरू शकणाऱया झाडांची छाटणी करण्यात येत आहे.

सर्वेक्षणानुसार या तीन रेल्वे मार्गालगत २ हजार ४२४ झाडांच्या छाटणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यातील पश्चिम रेल्वे रुळालगतची ३४, मध्ये रेल्वे लगतची १६ आणि हार्बर रेल्वे मार्गालगतची २ अशा एकूण ५२ ठिकाणच्या झाडांच्या छाटणीसाठी उद्यान विभागाने परवानगी दिली आहे. या ५२ ठिकाणी मिळून असलेल्या एकूण २ हजार ४२४ पैकी निम्म्याहून अधिक झाडांची छाटणी झाली आहे. घाटकोपर, विद्याविहार, वडाळा आदी परिसरातील रेल्वे रुळालगतच्या झाडांची छाटणी सुरू आहे.

मुंबई शहरात आतापर्यंत ३८ हजार ५७४ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. तर, खासगी तसेच शासकीय मालकीच्या परिसरामधील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासंदर्भात ७ हजार ३४ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. पालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. एकूण झाडांपैकी १ लाख ८६ हजार २४६ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. त्यापैकी १ लाख १४ हजार ३३७ हजार झाडांची छाटणी अपेक्षित आहे. पैकी दिनांक ३ मे २०२४ अखेरपर्यंत ३८ हजार ५७४ झाडांची छाटणी झाली आहे. दिनांक ७ जून २०२४ अखेरपर्यंत उर्वरित झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. मृत आणि कीड लागलेली तसेच वाकलेली ५०२ झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली आहेत. यापैकी ४८२ झाडे काढून टाकण्यात आली आहे.

SW/ML/SL

8 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *