पालिकेचे पाणीसाठ्यावर ३१ जुलै पर्यंत पुरेल अशा रीतीने नियोजन
मुंबई दि.7(एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलाशयांमध्ये गत वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य शासनाने यापूर्वीच भातसा व अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर पालिकेचे बारकाईने लक्ष असून ३१ जुलै पर्यंत पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करु नये व पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पालिकेने केले आहे .
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात जलाशयांमध्ये मिळून आजमितीस २ लाख ३८ हजार ५५२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर गरजेच्या तुलनेत हा साठा १६.४८ टक्के आहे. त्याचप्रमाणे, भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. हा सर्व साठा मिळून प्रतिवर्षाप्रमाणे ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन प्रशासनाने केले आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होण्यासाठी सध्या अनुकूल स्थिती आहे. त्याचप्रमाणे देशात यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला आहे. मे अखेरीस हवामान खात्याकडून मान्सूनविषयक अद्ययावत अंदाज वर्तवले जाणार आहेत. एकूणच, हवामान खात्याकडून वेळोवेळी वर्तवले जाणारे पावसाचे अंदाज लक्षात घेवून, त्याचप्रमाणे पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेवून पालिका प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. त्यामध्ये होणारे बदल लक्षात घेवून आगामी काळातील धोरण निश्चिती केली जाणार आहे .
पाणीसाठ्याची उपलब्धता पाहता, सध्या मुंबईत कोणतीही पाणीकपात लागू केलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करण्याचे कारण नाही. असे असले तरी, प्रशासनाने केलेल्या नियोजनाला मुंबईकरांचे देखील सहकार्य लाभले पाहिजे. वैयक्तिक स्तरावर सर्व नागरिकांनी आपल्या सवयींमध्ये त्याचप्रमाणे मुंबईतील सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील आपल्या कार्यपद्धतीमध्ये असे बदल स्वीकारावेत की ज्यातून पाण्याची बचत होईल, पाण्याचा अपव्यय रोखता येईल. पाण्याचा सर्वांनी काटकसरीने वापर करावा, पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करावा, असे विनम्र आवाहन पालिकेने केले आहे.
ML/ML/PGB 7 May 2024