व्हॉट्‍सॲपवर मिळणार सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचे तपशील

 व्हॉट्‍सॲपवर मिळणार सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचे तपशील

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीन धनंजय चंद्रचुड त्यांच्या नियुक्तीपासूनच सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजातील डिजिटलायझेशनसाठी आग्रही आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सर्व खटल्यांचे निकाल त्यांच्या प्रयत्नांनंतरच सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने डिजिटायझेशनच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकताना संबंधित खटल्यावर कधी सुनावणी होईल? तो खटला कधी दाखल करण्यात आला? याची माहिती व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विधिज्ञांना पाठविण्यात येईल अशी घोषणा केली आहे. यामुळे न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेत मोठी सुधारणा होईल तसेच कागदाची देखील बचत होईल.

सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या ‘इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी (आयसीटी) सर्व्हिसेस’सोबत व्हॉट्‍सॲपला जोडण्याची घोषणा सरन्यायाधीशांनी आज एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान केली. सरन्यायाधीशांनी या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हॉट्सॲप क्रमांकदेखील शेअर केला.

सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांची नोंद आहे असे वकील आणि याचिकाकर्ते यांना संबंधित खटल्याची सुनावणी कधी होईल? तसेच तो खटला नेमका कधी दाखल करण्यात आला? महत्त्वाचे आदेश आणि निकाल यांचा तपशील व्हॉट्‍सॲपवरून पाठविण्यात येईल. बार कौन्सिलच्या सर्व सदस्यांनादेखील रजिस्ट्रीच्या माध्यमातून हे संदेश पाठविण्यात येतील. एखाद्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्याचा तपशील व्हॉट्‍सॲपवरून पाठविण्यात येईल. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे म्हटले आहे.

यामुळे न्यायालयाचा वेळ अन् कागद वाचेल, अधिकाधिक लोकांपर्यंत कोर्ट पोहोचेल, दुर्गम भागातील लोकांनाही सहज ॲक्सेस मिळेल, तसेच महत्त्वाचे विषय नागरिकांना समजतील. न्यायालयाच्या सगळ्या सेवा आता ‘मेघराज क्लाउड २.०’ येणार आहेत. ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ने (एनआयसी) हे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. आता न्यायालयाचा डेटा या क्लाउडवर येणार आहे.

SL/ML/SL

27 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *