साखर कारखान्यांना दिलासा, सरकारने उठवली इथेनॉल निर्मिती बंदी

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इथेनॉल निर्मितीला घातलेला लगाम आणि साखर निर्यातीवरील बंधनांमुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने यांना खूप नुकसान सहन करावे लागत होते. राज्यातील २०६ पैकी ११४ कारखान्यांनी दोन हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची एफआरपी थकवली होती केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीचा आवळलेला लगाम, साखर निर्यातीवरील बंधनं आणि साखरेचा किमान विक्री दरात वाढ न केल्यानं कारखान्यांची आर्थिक कोंडी होती. या चिंताजनक पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंदी उठवून साखर कारखान्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने देशभरातील साखर कारखान्यांना बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल बनविण्यास बंदी घातली होती. अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार सरकारने साखर कारखान्यांना चालू वर्षात इथेनॉल उत्पादनासाठी ६.७ लाख टन बी हेवी मोलॅसिस वापरण्याची परवानगी दिली आहे.
सुधारित वाढीव साखर उपलब्धतेची आकडेवारी आणि त्या आधारे देशभरातील कारखान्यांच्या प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिलेल्या सुमारे सात लाख टन बी हेवी मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याबाबत विनंतीपत्र राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांना २४ फेब्रुवारी रोजी दिले होते.
केंद्र शासनातील संबंधित मंत्रालयीन विभागांमध्ये तातडीने हालचाली सुरु करत काल (ता. २४) एप्रिल रोजी केंद्र शासनाकडून सुमारे ७ लाख टन शिल्लक बी हेवी मळीचा वापर इथेनॉलकडे करण्याचा परवानगी देण्यात आली आहे. ३१ मार्च २०२४ अखेरच्या बी हेवी मळीच्या मात्रेतून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे पारित होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
या मधून सुमारे ३.२५ लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविली गेल्याने त्यातून ३८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होणार आहे. यातून २हजार ३०० कोटी रुपये मिलणार आहेत. या निर्णयामुळे साखरेचे साठे कमी होण्यात व त्याच्या स्थानिक साखरेचे विक्री दर सुधारण्यात मदत होणार आहे.
SL/ML/SL
25 April 2024