राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहीरनामा…
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या, राज्याच्या विकासप्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहीरनामा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला जाहीरनामा प्रकाशित केला.
‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित हा जाहीरनामा तयार करण्यात आलेला असून राष्ट्रवादी काँग्रेसची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे. त्यामध्ये सार्वजनिक सेवा… पायाभूत सुविधासह आर्थिक प्रगतीचा संकल्प व्यक्त करण्यात आलेला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्यांनी हा तयार केला आहे. पक्षासाठी एक चांगला जाहीरनामा तयार केला त्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांना अजित पवार यांनी धन्यवाद दिले.
या जाहीरनाम्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी पाठपुरावा करणार, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा, शेतकऱ्यांना एमएसबी मिळावी, अपारंपरिक वीज निर्मिती, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिगच्या संकटाला थांबवायचे असेल तर अपारंपरिक वीज निर्मितीला चालना, उद्योगांना प्राधान्य, कृषी पिक विम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ, मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ, जातीनिहाय जनगणना, ऊर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वन क्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा, ही ठळक वैशिष्ट्ये अजित पवार यांनी यावेळी सांगितली.
ML/ML/PGB 22 APR 2024