गुजरातमध्ये आढळले १५ मीटर लांबीच्या महाकाय सापाचे अवशेष

कच्छ, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आतापर्यंत सापडलेल्या सर्वात लांब सापाचे अवशेष गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सापडले आहेत. वासुकी इंडिकस असे या सापाच्या प्रजातीचे नाव आहे. याचा शोध आयआयटी-रुरकी येथील शास्त्रज्ञांनी लावला होता. संशोधकांना सापाच्या पाठीच्या 27 हाडांचा शोध लागला आहे. याची लांबी 11-15 मीटर (सुमारे 50 फूट) आणि त्याचे वजन 1 टन (1000 किलो) असते.
हा संशोधन अहवाल नुकताच ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. वासुकी इंडिकस हा आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्वात मोठ्या सापांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. या संदर्भातील संशोधन ‘नेचर’ या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात आलेले आहे. या संशोधनात म्हटल्याप्रमाणे हा अतिभव्य नाग ४७ दशलक्ष वर्षांपूर्वी इओसीन या कालखंडात अस्तित्त्वात होता. हा नाग संथ गतीने फिरणारा, हल्ला करणारा शिकारी होता, याने आपल्या भक्ष्याला पिळवटून मारले असे संशोधनात सिद्ध झाले आहे. या विषयावर सखोल संशोधक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुरकी (उत्तराखंड) येथील देबजित दत्ता आणि सुनील बाजपेयी या दोन संशोधकांनी केले आहे.
भगवान शंकराच्या गळ्याभोवती गुंडाळलेल्या नागावरून ‘वासुकी’ हे नाव पडले आहे. त्याला सापांचा राजा म्हटले जायचे. त्याचवेळी ‘इंडिकस’ या शब्दाचा अर्थ ‘भारताचा’ असा होतो. शास्त्रज्ञांच्या मते हा साप फक्त भारतातच आढळला होता. आता नामशेष झालेला हा साप जगातील सर्वात लांब सापांपैकी एक होता.
शास्त्रज्ञांचा असाही अंदाज आहे की तो ॲनाकोंडा सापासारखा संथ रांगणारा शिकारी असावा. इंडिकस हा आता नामशेष झालेल्या मॅडसोइडे कुटुंबाचा एक भाग आहे, जो आफ्रिका, युरोप आणि भारतासह विस्तृत भूगोलात राहत होता. हा साप 5 ते 6 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता.
SL/ML/SL
20 April 2024