महात्मा जोतिबा फुले मंडई पुनर्विकास कामांचा पालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई, दि.20 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. दादाभाई नौरोजी मार्गावर स्थित महात्मा जोतिबा फुले मंडईचा मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्विकास करण्यात येत आहे. या कामांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन आढावा घेतला. याठिकाणी मासळी विक्रेत्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन अद्ययावत इमारतीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. मंडई पुनर्विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, तसेच मासळी विक्रेत्यांसाठीच्या इमारतीची उर्वरित कामे देखील लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्त श्री. गगराणी यांनी याप्रसंगी दिले.
महात्मा जोतिबा फुले मंडईचा (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) चार भागात पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यातील भाग तीन व चारचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यादृष्टिने प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आयुक्त श्री. गगराणी यांनी आज भेट दिली. मंडईतील तळघरातील सुविधा, वाहनतळ, गाळे, विद्युतीकरण कामे, उद्वाहन व्यवस्था आदींची त्यांनी पाहणी केली. इमारतीमध्ये सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मासळी विक्रेत्यांसाठी शीतगृहाचीदेखील तजवीज करण्यात आली आहे. या सर्व कामांचा आयुक्त श्री. गगराणी यांनी तपशिल जाणून घेतला. भाग तीन व चार मधील रंगरंगोटीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पुरातन वारसा असलेल्या महात्मा जोतिबा फुले मंडईचा पुनर्विकास करताना आतील भागात एक एकर क्षेत्रफळामध्ये लॅण्डस्केपिंग देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे मंडईचे देखणेपण वाढणार आहे. मुंबईत येणारे परदेशी पाहुणे हमखास या मंडईला भेट देतात. पुनर्विकासानंतर विक्रेते, नागरिक यांच्यासाठी वाढीव सेवा-सुविधा उपलब्ध होणार असून पर्यटकांच्या पसंतीस देखील या सुविधा उतरतील, असा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.
या भेटीच्या निमित्ताने आयुक्त श्री. गगराणी यांनी प्राणिसंग्रहालयातील क्रॉक ट्रेल (मगर आणि सुसरसाठीचे मोठे तळे), पेंग्विन कक्ष तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाला देखील भेट दिली. नाट्यगृहात अधिकाधिक सुविधा कशा उपलब्ध करून देण्यात येतील याबाबत आयुक्त श्री. गगराणी यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.