लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी सुमारे साठ टक्के मतदान

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्पासाठी आज, १७ राज्यं आणि ४ केंद्रशासित प्रदेशातल्या १०२ मतदारसंघात मतदान झालं. पश्चिम बंगाल, माणिपूर आणि छत्तीसगढ या राज्यांत तुरळक ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटना वगळता, इतर सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात सुमारे ६० टक्के मतदान झालं. तर महाराष्ट्रात ५५.२९ टक्के मतदान पार पडलं. संध्याकाळी सात वाजेपर्यंत समोर आलेल्या टक्केवारीनुसार त्रिपुरा या राज्यात सर्वाधिक ७९.९० टक्के मतदान झालं आहे. बिहारमध्ये ४७.४९ टक्के सर्वात कमी मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.
वयोवृद्ध, पहिल्यांदा मतदान करणारे युवा, महिला, तृतीयपंथी अशा सर्व घटकांचा मतदानात उत्साहानं सहभाग दिसला.हिंसाचार होऊनही पश्चिम बंगालमध्ये मतदानाची टक्केवारी उत्तम होती. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या जम्मू मतदारसंघातही लोकांनी उत्साहानं मतदानात सहभाग घेतला.
संवेदनशील भाग वगळता इतर सर्व ठिकाणी मतदान सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होतं. बस्तर, गडचिरोली आणि गोंदिया अशा नक्षलग्रस्त भागात तीन वाजेपर्यंत मतदान झालं, या तिन्ही ठिकाणीची आकडेवारी उत्साहवर्धक आणि लोकशाही बळकट करण्याचा संदेश देणारी आहे. तामिळनाडूत आज एकाच टप्प्यात सर्व म्हणजे 39 जागांवर मतदान झालं, तर नागालँड, त्रिपुरा, लक्षदवीप आणि अंदमान अशा ठिकाणी एकेका मतदारसंघांसाठी मतदान झालं.
राज्यांत पूर्व विदर्भातल्या पाच मतदारसंघात सरासरी
5 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे –
रामटेक – 52.38 टक्के
नागपूर – 47.91 टक्के
भंडारा- गोंदिया – 56.87 टक्के
गडचिरोली- चिमूर – 64.95 टक्के
चंद्रपूर – 55.11 टक्के
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह आठ मंत्र्यांचं आणि दिग्गज नेत्यांचं भवितव्य आज मतदानयंत्रात बंद झालं. त्याशिवाय, गौरव गोगोई, कानिमोळी, कार्ति चिदंबरम, नकुलनाथ अशा विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही फैसला आज मतदारांनी केला. आजच्या पहिल्या टप्प्यात, सुमारे 16 कोटी मतदारांनी एकूण 1625 उमेदवारांचा फैसला मतदानयंत्रात बंद केला.
ML/ML/SL
19 April 2024