यमराजाच्या वेशात उमेदवाराची अर्ज भरायला एन्ट्री
माढा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी सर्व उमेदवारांची जोरदार तयारी सुरू असून मतदारांचे लक्ष वेधुन घेण्यासाठी उमेदवार विविध क्लृप्त्या लढवत आहेत. अनेक उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करून लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल केले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक उमेदवार चक्क रेड्यावर बसून आल्याने संपूर्ण मतदारसंघात याची चर्चा रंगली आहे. राम गायकवाड (ram Gaikwad) असे या उमेदवाराचे नाव असून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहे. राम गायकवाड माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावर बसून यमराजाच्या वेशात निवडणूक अधिकारी कार्यालयात आले. देशातील वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे, असे या उमेदवाराने सांगितले.
राम गायकवाड मूळचे पंढरपूरमधील रहिवासी असून माढा मतदारसंघातून ते लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. ओबीसी प्रवर्गातून टिकणारे मराठा आरक्षण मिळावे, हा मुद्दा घेऊन राम गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनी सांगितले की, मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, वाढत्या भ्रष्टाचारावर आळा बसावा आणि सत्ताधारी पक्षाकडून ईडी व अन्य तपास यंत्रणांचा जो गैरवापर करण्यात येत आहे, तो टाळावा, यासाठी आपण यमराज बनून आलो आहे. देशात केवळ स्वार्थासाठी राजकारण केले जात आहे. नेते जनतेला घाबरत नाहीत. त्यामुळे आता शेवटचे टोक म्हणून यमाला तर घाबरतील म्हणून या वेशात आल्याचे राम गायकवाड यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात लढत होत आहे. त्यातच अपक्ष उमेदवार राम गायकवाड यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरला आहे.
SL/ML/SL
18 April 2024