पालिकेची मुंबई मेट्रो रेल्वे कंत्राटदारांना अंतिम नोटीस

 पालिकेची मुंबई मेट्रो रेल्वे कंत्राटदारांना अंतिम नोटीस

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी सुमारे ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता करभरणा न केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून त्यांना सात दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. या कंत्राटदारांना महानगरपालिकेने मार्च २०२४ मध्ये नोटीस जारी करत २१ दिवसांच्या आत करभरणा करण्यास यापूर्वी कळवले होते. मात्र या कालावधीत कंत्राटदारांनी करभरणा न केल्यामुळे आता सात दिवसांची अंतिम नोटीस जारी करण्यात आली आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) (श्रीमती) डॉ. अश्विनी जोशी, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन ) सुनील धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी विहित मुदतीत मालमत्ता कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

मुंबई महानगरामध्ये मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) वतीने मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे सुरू आहेत. यासाठी एमएमआरसीलकडून मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही, मेसर्स डोगस सोमा, मेसर्स एचसीसी-एमएमएस-१, मेसर्स एचसीसी-एमएमएस-२ या कंत्राटदार कंपन्यांना मेट्रोचे काम करण्यासाठी वडाळा ट्रक तळ, भूकर क्रमांक ८ टप्पा २ आणि ३ याठिकाणी कास्टिंग यार्डसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

एमएमआरसीएल आणि संबंधित कंत्राटदारांमध्ये झालेल्या करारानुसार, या भूखंडाच्या वापरासंबंधीचे मालमत्ता कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. या पाचही कंत्राटदारांकडे मिळून ३२६ कोटी २२ लाख ६९ हजार ८४६ रुपयांचा मालमत्ता कर थकित आहे. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून वारंवार सूचना देऊनही यापैकी चार कंत्राटदारांनी आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून अद्यापर्यंत करभरणा केलेला नाही. तर, एचसीसी-एमएमसी या कंत्राटदाराकडे आर्थिक वर्ष २०१०-११ पासून मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम २०३ नुसार, दिनांक १६ मार्च २०२४ रोजी संबंधित कंत्राटदारांना २१ दिवसांच्या आत करभरणा करण्याची नोटीस जारी करण्यात आली. ही २१ दिवसांची देय मुदत दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी संपुष्टात आली. या २१ दिवसांच्या कालावधीतही त्यांनी करभरणा न केल्याने आता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही, मेसर्स डोगस सोमा यांना १५ एप्रिल २०२४ रोजी तसेच मेसर्स एचसीसी-एमएमएस-१ आणि २ यांना १६ एप्रिल २०२४ रोजी सात दिवसांची अंतिम देय मुदत नोटीस जारी करण्यात आली आहे. या सात दिवसांच्या कालावधीत कंत्राटदारांनी करभरणा न केल्यास त्यांच्यावर मालमत्तेची अटकावणी आणि जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ML/ML/PGB
16 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *