विशाल पाटील यांची बंडखोरी, दाखल केला उमेदवारी अर्ज

सांगली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एक अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी 19 एप्रिल ला काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जर मिळाला नाही, तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील यांनी केला आहे. तत्पूर्वी सांगली शहरातून शक्ती प्रदर्शन करत पदयात्रा आणि सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी माजी मंत्री अजित घोरपडे, काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, सिकंदर जमादार, सुजय नाना शिंदे हे उपस्थित होते. दरम्यान मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या पक्षाचे झेंडे बाहेर ठेवून विशाल पाटील यांना उघडपणे सभेत येऊन पाठिंबा दिला आहे. विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेला. शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.
ML/ML/PGB
16 Apr 2024