भावना गवळी यांची नाराजी दूर, महायुतीचा प्रचार करणार

वाशीम, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. माजी मंत्री अर्जुन खोतकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा अलीकडे भावना गवळी यांची त्यांच्या रिसोड येथील घरी भेट घेतली होती मात्र तोपर्यंत भावना गवळी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. लोकसभेचे तिकीट कटल्यानंतर आज प्रथमच त्यांनी माध्यमासमोर येउन वाशीम-यवतमाळ लोकसभेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी जोमाने प्रचार करणार असल्याची माहिती दिली.
मध्यंतरी आईच्या आजारपणामुळे मला मुंबईत जावे लागले. तिकीट कटल्याची खंत नक्कीच वाटली मात्र देशाचे कर्तुत्ववान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी मी राजश्री पाटील यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रचारात उतरणार आहे असे भावना गवळी यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.
मागील २५ वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या विविध विकास कामांचा आढावा खासदार गवळी यांनी यावेळी दिला. सिंचन सुविधा, वैद्यकीय महाविद्यालय, शंकुतला रेल्वे ब्रॉडगेज मान्यता, शासकीय महाविद्यालय, रेल्वे उड्डाण पुल आदी विकास कामांची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या उर्जेने काम करतात निश्चितच ते प्रेरणादायी असून आगामी लोकसभा निवडणूक महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील ह्याच विजयी होतील असा विश्वास भावना गवळी यांनी व्यक्त केला.
ML/ML/SL
13 April 2024