मुंबईतील दहा हजार महिला बचत गटांची उत्पादने उपलब्ध होणार मोबाईल ॲपवर

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील महिला बचतगटांची उत्पादने ही डबेवाल्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहचवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका एक ॲप्लिकेशन विकसित करणार आहे. मुंबईतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच उत्पादनांच्या मार्केटिंग आणि ब्रॅंडिंगसाठी ॲप्लिकेशन विकसित करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. महिला बचतगटांनी उत्पादने ऑनलाईन पद्धतीने पोहचवण्यासाठीची यंत्रणा ॲपच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. ही उत्पादने घरोघरी पोहचवण्यासाठी मुंबईतील डबेवाल्यांची मदत घेण्यात येईल.
मुंबईतील महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून ॲपच्या माध्यमातून शिस्तबद्ध यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. ॲपमध्ये समाविष्ट असणाऱ्या उत्पादनांसाठी एक विशिष्ट गुणवत्ता परीक्षण, दळणवळण व्यवस्था आदी सगळ्या निकषांची पूर्तता करणाऱ्या उत्पादनांचा समावेश असावा. तसेच उत्पादनांचे चांगले ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग व्हावे, अशा सूचना डॉ. शिंदे यांनी दिल्या आहेत. उत्पादने घरोघरी पोहचवण्यासाठी मुंबईतील डबेवाल्यांची यंत्रणा सोबत घ्यावी, तसेच अधिक सक्षम नेटवर्क वापरण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबई डबेवाला संघटनेच्या शिष्टमंडळाने आज (१२ एप्रिल ) भेट घेतली. यावेळी वातावरण संस्थेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. महिला बचतगटांची उत्पादने संपूर्ण मुंबईत पोहचवण्यासाठी डबेवाला संघटनेने संमती दिली आहे.
मुंबईतील सुमारे दहा हजार महिला बचतगटांसोबत एक लाखांहून अधिक महिला विविध प्रकारच्या वस्तू आणि उत्पादने तयार करत आहेत. त्यामध्ये खाद्यपदार्थांपासून ते महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तुंचा समावेश आहे. या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा नियोजन विभाग ॲप विकसित करण्याची कार्यवाही करीत आहे. ॲप विकसित करण्यासाठी महानगरपालिकेने एस. एन. डी. टी. विद्यापिठासोबत सामंजस्य करारही केला आहे. या विद्यापिठाच्या इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून ॲप्लिकेशन विकसित करण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नांतून महिला बचतगट तसेच मुंबई डबेवाला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही उत्पादने घरोघरी पोहचवण्याचा उद्देश असल्याची माहिती महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी दिली.
या ॲपमध्ये उत्पादने तयार करतानाची महिलांची छायाचित्रे आणि व्हिडिओ याचा समावेश असेल. तसेच अत्यंत प्रभावीपणे ही उत्पादने घरोघरी पोहचतील यासाठी ॲपमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात येतील. त्यासोबतच महिला बचतगटांच्या उत्पादनाचे चांगले ब्रॅंडिंगही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बचतगट उत्पादनांना घरोघरी पोहचवण्यासाठी डबेवाल्यांची यंत्रणा वापरण्यात येणार आहे. त्याअनुषंगानेच ॲप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही डॉ. जांभेकर यांनी नमूद केले.
ML/ML/PGB
12 Apr 2024