पाण्याअभावी मोसंबी बागा सुकल्या, दुष्काळ झाला तीव्र

जालना, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हयात घनसावंगी तालुक्यातील राणीऊंचेगाव परिसरात दुष्काळाची तीव्रता दिसून येतेय. राणीउंचेगाव भागातील मोसंबी बागा पाण्याअभावी सुकल्या आहेत. आज गुढी पाडव्याचा नवीन वर्षाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय. मात्र हे नवीन वर्ष आमच्यासाठी दुःखाचे असून गुढी पाडव्यासाठी आमचेकडे गाठ्या घ्यायला सुद्धा पैसे नसल्याची प्रतिक्रिया राणीउंचेगाव येथील शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. या वर्षी पाऊस नेहमी पेक्षा कमी झाल्याने शेतकरी राजाचे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.
नदी, नाले, विहिरी, ओढे कोरडे ठाक पडले असून शेती बागा, फळ बागांसह जनावरांच्या चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नेते मंडळी प्रचारात व्यस्त झालीय, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बांधावरील हे विदारक चित्र पाहून अंगावर काटे येत आहेत. हे दृश्य पाहून सरकार दरबारी समस्या मांडायला राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांना वेळ नसून ते प्रचारात व्यस्त झालेत. त्यामुळे जर नेत्यांनाच वेळ नसेल तर आम्ही आता करी तरी काय असा प्रश्न शेतकरी विचारात आहेत.
यंदा मतदान आमचा हक्क असून आम्ही मतदान करू आणि नोटा ला मतदान करू नाही तर एक मताने निर्णय घेऊन मतदानावर बहिष्कार टाकू अशा प्रतिक्रिया या संतप्त शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. शेतकरी राजा त्रस्त आणि राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त अशी परिस्थिती आता निर्माण झालीय. त्यामुळे आता तरी मायबाप सरकार याकडे लक्ष देते का आणि बळीराजाची ही समस्या सोडवते हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.
ML/ML/ SL
9 April 2024