जायकवाडी धरणातील जलसाठा १८ टक्यांवर
छ. संभाजी नगर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळीनंतर सुरु झालेल्या तीव्र उन्हाच्या झळांनी राज्यातील नागरीक हवालदिल झाले आहेत. त्यातच आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातल्या बहुतांश धरणांतील पाणी पातळी झपाट्याने घसरत असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठी झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जायकवाडी धरणात फक्त १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाणीसाठा कमी राहिल्याने उद्योजकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांची चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्यातच पाणीसाठा १८ टक्क्यांवर आल्याने येत्या काळात हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाण्याची शक्यता आहे.
उद्योगांच्या पाणी कपातीबाबत सध्यातरी कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नाही, मात्र आगामी काळात परिस्थिती चिंताजनक राहिली तर उद्योगांच्या पाणीकपातीचा विचार करू असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटले आहे. २०१६ साली एप्रिल महिन्यात उद्योगांच्या पाणीकपातीचा निर्णय झाला होता. त्यानंतर ८ वर्षांनी तशी परिस्थिती ओढावते की काय अशी भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण ६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र म्हटले जाते. मात्र वाढते नागरीकरण,औद्योगिकरण, पाणी पुनर्वापराविषयी अनास्था, घटते पाऊसमान अशा विविध कारणांमुळे मराठवाड्याचा हा महत्त्वाच्या जलसाठा घटत चालला आहे. पावसाला अजून दीड महिना बाकी असताना जायकवाडीचा पाणीसाठी झपाट्याने घसरल्याने नागरीक आणि प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
SL/ML/SL
9 April 2024