मुंबईचा जलसाठा २७ टक्क्यांवर

 मुंबईचा जलसाठा २७ टक्क्यांवर

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयटी हब असलेल्या बंगळुरुला सध्या तीव्र पाणीटंचाईच्या समस्येने ग्रासले आहे. त्याता महानगरी मुंबईवर देखील जलसमस्येचे सावट गडद होताना दिसत आहे. पावसाला असून दोन महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक असताना मुंबईची तहान भागवणाऱ्या सात प्रमुख जलस्रोतांमधील जलसाठा झपाट्याने घसरत आहे. उत्तरोत्तर विस्तारत जाणाऱ्या महानगरी मुंबईवरी अतिरिक्त लोकसंख्येच्या भारामुळे तसेच प्रचंड प्रमाणात होणाऱ्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात असल्याने मुंबईवर पाणी संकट ओढवल्याचे जलतज्ज्ञांचे मत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा कमी होऊ लागल्याने मुंबईकरांची जलचिंता वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून केवळ २७ टक्के पाणी शिल्लक असून जूनअखेपर्यंतच हे पाणी पुरणार आहे.

यंदाही पावसाने ओढ दिल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे राज्यात आणि देशातही पाणीसाठा ३५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज ३,९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे.

रविवारी उर्ध्व वैतरणा धरणात ३६.६० टक्के, मोडकसागरमध्ये २४.९७ टक्के, तानसामध्ये ४१.८६ टक्के, मध्य वैतरणामध्ये १२.१३ टक्के, भातसामध्ये २६.३४ टक्के, विहारमध्ये ३९.६१ तर तुळशीमध्ये ४४.२० टक्के साठयाची नोंद झाली. सातही धरणांमध्ये सरासरी केवळ २७.८१ टक्के पाणीसाठा आहे. ७ एप्रिल २०२३ रोजी ३३.९० टक्के तर २०२२ मध्ये ३६.७६ टक्के पाणीसाठा होता.

भांडुप जलशुद्धीकरण केंद्राच्या परिरक्षण कामांमुळे शहरात १५ टक्के पाणीकपात होत असताना सातत्याने घटत चाललेल्या पाणीसाठयामुळे चिंतेत भर पडली आहे.राज्याच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठा ३५.८८ टक्क्यांवर आला आहे. सर्वात कमी म्हणजे १८.३१ टक्के पाणीसाठा औरंगाबाद विभागात आहे. देशातील सरासरी पाणीसाठाही ३५ टक्क्यांवर असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली.

SL/ML/SL

8 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *