रोहन भाटकरचे हवेतील कापडी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक
सिंधुदुर्ग, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एक जागतिक आणि दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला सिंधुदुर्ग मधील देवबागचा सुपुत्र रोहन भाटकर यांनी आज मालवण देवबाग संगम येथे पॅरासेलिंगच्या साह्याने कापडी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक हवेत सादर केले. कापडी मल्लखांबा बाबत सर्वत्र जागृती व्हावी हा उद्देश या चित्तथरारक प्रात्यक्षिका मागे असल्याचे रोहन भाटकरने सांगितले .
भाटकरने साहसी क्रीडा प्रकारांमध्ये आतापर्यंत तीन विक्रम केले आहेत . त्यामध्ये लेह-लडाख पर्यंत धावून केलेल्या प्रवास , मोटरसायकलने कोकणातील 39 किल्ल्यांवर केलेला प्रवास आणि आजचा देवबाग येथील येथील पॅरासेलिंगच्या मदतीने केलेला हवेतील कापडी मल्लखांब असे तीन विक्रम त्याने केले आहेत . फिटनेस ट्रेनर असलेला रोहन भाटकर 2017 पासून श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर , मुंबई येथे मल्लखांब खेळाचा सराव करत आहे .
रविवारी देवबाग येथे पॅरासेलिंगच्या साह्याने रोहन हवेत गेला आणि त्यानंतर कापड सोडून त्याने हवेतच मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. कापडी मल्लखांबाच्या साह्याने त्याने योगासनाचे प्रकार उपस्थितांना करून दाखवले . कापडी मल्लखांबा बाबत सर्वत्र जागृती व्हावी यासाठी रोहन भाटकरने हा सर्व प्रयत्न केला आहे . या चित्तथरारक प्रात्यक्षिकाच्या वेळी देवबाग सरपंच उल्हास तांडेल , अवी सामंत , राजन कुमठेकर , विठ्ठल भाटकर , वर्षा भाटकर , कृपा भालेराव तसेच साहसी क्रीडा प्रेमी आदी उपस्थित होते.
ML/ML/ SL
7 April 2024