१ हजार ६५६ सरकारी नोकरदारांनी घेतला मोफत धान्याचा लाभ

 १ हजार ६५६ सरकारी नोकरदारांनी घेतला मोफत धान्याचा लाभ

अलिबाग, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोरगरिबांची सोय व्हावी म्हणून स्वस्त धान्य दुकानावर त्यांना सरकारकडून मोफत धान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र हे अन्नधान्य सरकारी नोकरदारांनीच लाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कुंपणानेच शेत खाल्ल्यांच्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. रायगड जिल्ह्यात शिधा वाटप केंद्रांवर, मोफत धान्याची उचल करणारे १ हजार ६५६ नोकरदार सापडले आहेत. आधार सलग्न प्रणाली मुळे सरकारी बाबू कडून मोफत धान्य उचल प्रकरणे उघडकीस आली आहेत. ही बाब उघडकीस येताच, या सर्वांचा धान्यपुरवठा आता थांबविण्यात आला आहे.

मोफत धान्य उचल करणाऱ्या सरकारी बाबूंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक लिंकिंग केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. यातूनच मोफत धान्य किती कर्मचाऱ्यांनी उचलले हे देखील आता समोर आले आहे. आता किती वर्षांपासून हे कर्मचारी मोफत रेशन उचलत आहेत, याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्य योजनेअंतर्गत अंत्योदय कुटूंबाना दरमहा ३५ किलो तर, प्राधान्य कुटूंबांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य वितरण सध्या केले जात आहे. याच योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी देशातील ८० कोटी लाभार्थ्यांना धान्य मोफत दिले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकार १२ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

देशातील कोणताही भारतवासी उपाशी राहू नये, हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र या मोफत धान्य योजनेचा लाभ घेण्याचा मोह सरकारी बाबू लोकांनाही आवरता आलेला नाही. जिल्ह्यातील १ हजार ६५६ नोकरदारांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. या बाबत लवकरात लवकर दोषींची नावे समोर यावीत अशा मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे.

SL/ML/SL

5 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *