IPL सामन्यातील पाण्याच्या अपव्ययाची राष्ट्रीय हरीत लवादाने घेतली गंभीर दखल

 IPL सामन्यातील पाण्याच्या अपव्ययाची राष्ट्रीय हरीत लवादाने घेतली गंभीर दखल

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर उन्हाचा पारा चढून पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यातच IPL स्पर्धांचा माहोलली सुरु झाला आहे. या निमित्ताने देशाच्या विविध स्टेडीअमवर होणाऱ्या सामन्यांच्या निमित्ताने मैदानांचा मेटेनन्स करण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेले बंगळुरु शहर गेल्या काही दिवसांपासुन पाण्याच्या टंचाईमुळे हवालदिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडीयमवर होणाऱ्या इंडियन प्रिमियम लीगच्या (आयपीएल) प्रत्येक सामन्यासाठी पिण्यासाठी शुध्द केलेल्या सुमारे ७५ हजार लीटर पाण्याची नासाडी केली जात असल्याची गंभीर दखल राष्ट्रीय हरीत लवादाने स्वतःहून घेतली आहे.

बंगळुरुतील सामान्य जनतेला पाणीटंचाईने त्रस्त असताना पिण्याच्या पाण्याची उधळपट्टी का केली जात आहे,असा सवाल करीत स्वतःच खटला दाखल करून घेतला आहे. हरीत लवादाने कर्नाटक राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ, पाणीपुरवठा आणि मलनिःसारण विभाग आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (केएससीए) नोटीस बजावली आहे.क्रिकेट सामन्यांसाठी पिण्याचे पाणी वापरण्याचे कारण आणि किती पाणी वापरले जाणार याचा तपशिल सादर करावा,असे आदेशही लवादाने केएससीएला दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २ मे रोजी होणार आहे.

कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने (केएससीए) आयपीएल सामन्यांदरम्यान मैदानावरील हिरवळीवर फवारण्यासाठी पाण्याची मागणी बंगळुरु पाणी पुरवठा आणि मलनिःसारण विभागाकडे केली होती. ती मागणी पाणी पुरवठा विभागाने मान्य केली आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियम आयपीएलचे तीन सामने खेळविले जाणार आहेत. या प्रत्येक सामन्यासाठी सुमारे ७५ हजार लीटर पाण्याचा पुरवठा करण्यास पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे,असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. त्याची दखल राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. प्रकाश श्रीवास्तव आणि तज्ज्ञ समितीवरील सदस्य डॉ. सेंथील यांनी घेतली आहे. बंगळुरुमध्ये दररोज सुमारे ५०० एमएलडी पाण्याचा तुटवडा भासत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने काही ठोस निर्णय घेतले आहेत. बागकाम, गाड्यांची धुलाई आणि बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. असे असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यास मान्यता कशी काय दिली जाऊ शकते,असा सवाल नियतकालिकाने उपस्थित केला होता.

SL/ML/SL

4 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *