उंदीर चावल्यामुळे हॉस्पिटलमधील ICU तील रुग्णाचा मृत्यू
पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रुग्णालयांच्या गलथान कारभारामुळे तरुण रुग्णाचा जीव जाण्याची धक्कादायक घटना पुणे येथील ससुन या प्रसिद्ध रुग्णालयात घडल्याचे उघडकीस आले आहे. आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या ३० वर्षीय रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सागर रेणूसे असे उंदराने चावा घेतल्यानं मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ माजली आहे. सागरचा मृत्यू उंदीर चावल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तसेच जोपर्यंत संबंधितांवर योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. नातेवाईकांनी ससून रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र रुग्णालयाने हा दावा फेटाळून लावला आहे.
सागरचा मृत्यू झाल्यावर नातेवाईकांनी त्याला उंदीर चावल्याचा आरोप केला होता. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे झाल्याच्या आरोपाला नकार दिला होता. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरवर उंदीर चावल्याच कबूल केलं. त्यानंतर नातेवाईक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार मृत सागर रेणुसे याला काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला आहे.
SL/ML/SL
2 April 2024