कोकणातील हा महत्त्वाचा घाट २ महिने राहणार बंद

 कोकणातील हा महत्त्वाचा घाट २ महिने राहणार बंद

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकणात जाणाऱ्या तसेच कोकणातून पुण्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण कोकणातील महत्त्वाचा वरंधा घाट मार्ग १ एप्रिल पासून ३१ मे पर्यत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी जावळे यांनी बजावले आहेत. म्हाप्रळ भोरमार्गे पुणे येथे जाणार्‍या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. या मार्गावरील राजेवाडी फाटा ते रायगड जिल्हा हद्दी पर्यतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र वरंध घाटातील रुंदीकरणाचे काम आणि संरक्षक भिंतीचे काम चालू वाहतुकीमध्ये पावसाळ्यापुर्वी करणे अशक्य असल्याने कोकणातून पुणे येथे जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग बंद केल्याने येथील प्रवाशांना पुन्हा ताम्हाणे अथवा महाबळेश्वर मार्गे पुणे असा लांबचा खर्चिक वळसा घालावा लागणार आहे.

पावसाळ्यात होणार्‍या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावर आल्याने रस्ते आणि संरक्षक भिंती वाहून गेल्याने भोर मार्गे पुणे जाणारा मार्ग गेल्या दोन तीन वर्षांपासून पावसाळ्यात बंद ठेवण्यात येत आहे. या मार्गाच्या मजबुतीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरु आहे.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी गतवर्षी राजेवाडी फाटा ते भोर मार्गे पुणे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन हा रस्ता दुपदरी काँक्रीटचा करण्याची घोषणा केली होती त्यानुसार या रस्त्याचे कामही सुरु करण्यात आले. सद्यस्थितीत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहूतांश काम पूर्ण झालेले आहे, परंतू साखळी पारमाची वाडी रायगड जिल्हा हद्द या लांबीमध्ये काम सुरु करावयाचे आहे. परंतू सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करायला अपुरी आहे.

या लांबीमध्ये चालू वाहतूकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापुर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे शक्य होणार नाही. दि. १ एप्रिल ते ३० मे २०२४ पर्यंत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक बंद करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी रायगड यांनी बजावले आहे.

SL/ML/SL

1 April 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *