पाकिस्तानात पेट्रोल 289 रुपये प्रति लिटर
इस्लामाबाद, दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतावर कुरघोडी करण्यात मग्न असलेल्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांत डबघाईला आली आहे. नव्यानेच निवडून आलेले सरकारही यात काही सुधारणा करू शकलेले नाही. देशाची आर्थिक स्थिती पाहता पंतप्रधान शाहबाज शरीफ, राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि कॅबिनेट मंत्र्यांनी या कार्यकाळासाठी आपले वेतन वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आर्थिक अस्थिरतेमुळे पाकमधील जनता हवालदिव झालेली असताना आता पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने पेट्रोलच्या दरात मोठी वाढ केली आहे. पेट्रोलची किंमत पाकिस्तानी रुपयांनी 9.66 रुपयांनी वाढून 289.41 रुपये झाली आहे. तर हाय-स्पीड डिझेल 3.32 रुपयांनी कमी होऊन 282.24 पाकिस्तानी रुपयांवर पोहोचले आहे. नवीन दरही लागू करण्यात आले आहेत.
पाकिस्तानी मीडिया ‘द डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने म्हटले आहे की, देशातील पेट्रोलच्या किमती वाढण्याचे कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलच्या वाढलेल्या किमती आहेत. वास्तविक, सरकार दर 15 दिवसांनी इंधनाच्या किमतींचा आढावा घेते आणि जागतिक तेलाच्या किमती आणि स्थानिक चलन विनिमय दरांमधील चढउतारांच्या आधारे ते वाढवते किंवा कमी करते.
16 मार्च रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला नाही. पेट्रोलचा प्रति लिटर दर 279.75 रुपये आणि एक लिटर डिझेलचा दर 285.56 रुपये होता. म्हणजेच 15 दिवसांत पेट्रोलचे दर सुमारे 9 रुपयांनी वाढले आहेत.
पेट्रोलचा वापर बहुतांशी खाजगी वाहतूक आणि लहान वाहनांसाठी केला जातो. त्यामुळे दरवाढीचा थेट परिणाम पाकिस्तानातील मध्यमवर्गीय आणि निम्नवर्गीय लोकांवर होणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने, ट्रेन, ट्रक, बस यामध्ये डिझेलचा वापर केला जातो. त्यामुळे वाहतूक खर्च वाढल्याने इतर वस्तूंच्या किमतीही वाढणार आहेत. याचा फटका मध्यम व निम्नवर्गीयांनाही सहन करावा लागणार आहे.
पाकिस्तानी मीडिया ‘द डॉन’नुसार, सरकार पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 60 रुपये कर आकारत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत झालेल्या करारांतर्गत सरकारने चालू आर्थिक वर्षात 869 अब्ज रुपयांचा कर गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या सहामाहीत (जुलै-डिसेंबर) सुमारे 475 अब्ज रुपये उभारले गेले आहेत आणि आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे 970 अब्ज रुपये उभारले जाण्याची अपेक्षा आहे.देशाचा परकीय चलनाचा साठा सध्या $8 अब्ज इतका आहे, जो सुमारे दीड महिन्याच्या वस्तूंच्या आयातीइतका आहे. देशाकडे किमान ३ महिने माल आयात करण्याइतका पैसा असला पाहिजे.
SL/ML/SL
1 April 2024