तब्बल 20 दिवसांनी सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण

लडाख, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांनी २० दिवसांपासून सुरू असले उपोषण अखेर सोडले आहे. लडाखच्या जनतेच्या मागण्यांसाठी ते 6 मार्चपासून उपोषणावर होते. सोनम वांगचुक लडाखला पूर्ण राज्य, स्थानिक लोकांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, लेह आणि कारगिलसाठी प्रत्येकी एक संसदीय जागा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी या मागण्यांसाठी आंदोलन करत होते. उपोषण संपवल्यानंतर सोनम वांगचुक म्हणाले– हा आंदोलनाचा शेवट नाही तर एक नवीन सुरुवात आहे. उद्यापासून महिला उपोषण करणार आहेत. जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागेल, तोपर्यंत आम्ही ते करू, पंतप्रधान मोदींनी निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करावीत.याआधी मंगळवारी सकाळी वांगचुक यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहन केले. वांगचुक म्हणाले होते- पीएम मोदी हे रामाचे भक्त आहेत. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ ही रामाची शिकवण त्यांनी पाळली पाहिजे.
या वर्षाच्या सुरुवातीला बौद्ध-बहुल लेह आणि मुस्लिम-बहुल कारगिलच्या नेत्यांनी लेह-आधारित सर्वोच्च संस्था आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) च्या बॅनरखाली हातमिळवणी केली. यानंतर लडाखमध्ये प्रचंड निदर्शने आणि उपोषण सुरू झाले. मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्राने उच्चस्तरीय समिती स्थापन केली. मात्र, आंदोलकांशी चर्चा यशस्वी झाली नाही. 4 मार्च रोजी लडाखच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि सांगितले की केंद्राने मागण्या मान्य करण्यास नकार दिला आहे. दोन दिवसांनी वांगचुक यांनी लेहमध्ये उपोषण सुरू केले.
5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून पूर्ण राज्याचा दर्जा रद्द केला होता. यानंतर जम्मू-काश्मीर हा वेगळा केंद्रशासित प्रदेश बनला. लेह आणि कारगिल एकत्र करून लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला.यानंतर लेह आणि कारगिलमधील लोकांना राजकीयदृष्ट्या वेगळं वाटू लागलं. त्यांनी केंद्राच्या विरोधात आवाज उठवला. गेल्या दोन वर्षांत लोकांनी पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने केली आहेत, ज्यामुळे त्यांची जमीन, नोकऱ्या आणि त्यांना कलम 370 अंतर्गत मिळालेली वेगळी ओळख कायम ठेवण्यात आली आहे.
ML/ML/SL
27 March 2024